एसआयटीमार्फत शिष्यवृत्तीची चौकशी
By Admin | Published: August 25, 2016 11:40 PM2016-08-25T23:40:02+5:302016-08-25T23:41:22+5:30
हिंगोली : गडचिरोली येथे शिष्यवृत्तीत झालेल्या अनागोंदी कारभाराच्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातही काही अनागोंदी कारभार झाला आहे की काय?
हिंगोली : गडचिरोली येथे शिष्यवृत्तीत झालेल्या अनागोंदी कारभाराच्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातही काही अनागोंदी कारभार झाला आहे की काय? याची चाचपणी करण्यासाठी तब्बल पाच महिन्यांपासून एसआयटी पथक जिल्ह्यात तळ ठोकून आहे. यात शिष्यवृत्ती विभागाची कसून चौकशी केली जात असून, महाविद्यालय स्तरावरही भेटी देण्यात येत आहेत.
जानेवारी महिन्यामध्ये गडचिरोलीत शिष्यवृत्तीमध्ये कोट्यवधीचा अनागोंदी कारभार समोर आला होता. या प्रकारामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची वेळ आली होती. तोच प्रकार हिंगोली जिल्ह्यात तर झाला नाही ना याची फार बारकाईने तपासणी केली जात आहे. सुरवातीला या पथकाने कार्यालयास अधून-मधून भेटी दिल्या. नंतर आॅडिट सुरु केले. शासनाकडून यासाठी स्वतंत्र समिती नेमली असून, या समितीअंतर्गत हे पथक एप्रिल महिन्यांपासून जिल्ह्यात तळ ठोकून आहे. पथकासह जालना येथील पोलिस अधीक्षकांनीही शिष्यवृत्ती विभागाला भेट दिली आहे. या चौकशीबाबत पूर्णत: गोपनीयता बाळगण्याचे बंधन असल्याने, कार्यालयात नेमके काय सुरु आहे. हे कोणाच्याच लक्षात येत नाही. या पथकामुळे शिष्यवृत्ती विभागात काम करणाऱ्यांना मात्र चांगलीच धासकी बसली आहे. हे पथक केव्हाही कार्यालयास भेटी देत आहे. आजघडीला पथकामार्फत जिल्ह्यातील सर्वच महाविद्यालयांच्या भेटी देण्याचा कार्यक्रम सुरु असून, त्या ठिकाणच्या शिष्यवृत्ती विभागातील लहान सहान कागदपत्रांची सूक्ष्म तपासणी केली जात आहे. या तपासणीस शिष्यवृत्ती विभागातील एखाद्या कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद न दिल्यास त्या कर्मचाऱ्यावर प्रशासकीय कारवाई करण्याचेही परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यामुळे ही चौकशी पूर्णत: पारदर्शक होणार असल्याचे सध्या तरी संकेत आहेत. (प्रतिनिधी)