व्हॉट्सअॅपवर फुटला एमबीएचा पेपर, औरंगाबादेतील प्रकार; तिघांवर फसवणुकीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 03:51 AM2018-01-02T03:51:38+5:302018-01-02T03:51:47+5:30
एमबीएच्या प्रथम सत्राचा पेपर व्हाट्सअॅपवरुन फोडल्याचा प्रकार वसंतराव नाईक महाविद्यालयात उघडकीस आला. याप्रकरणी एक परीक्षार्थी आणि त्याचे दोन साथीदारांवर फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
औरंगाबाद : एमबीएच्या प्रथम सत्राचा पेपर व्हाट्सअॅपवरुन फोडल्याचा प्रकार वसंतराव नाईक महाविद्यालयात उघडकीस आला. याप्रकरणी एक परीक्षार्थी आणि त्याचे दोन साथीदारांवर फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रथम सत्र परीक्षा २६ डिसेंबरपासून सुरू आहेत. वसंतराव नाईक महाविद्यालयातील केंद्रावर एमबीएच्या ‘अकाऊंटिंग फॉर मॅनेजर’ या विषयाचा पेपर होता. परीक्षा हॉल क्रमांक ६ मध्ये देवगिरी अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाचा विद्यार्थी शेख अमजद कलीम हा परीक्षा देत होता. दहा वाजता पेपर सुरू झाल्यानंतर शेखने ‘फ्यूचर मॅनेजर’ या दीडशे मित्रांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर प्रश्नपत्रिकेचा स्नॅप टाकला. या ग्रुपचे सदस्य असलेले योगेश भवरे आणि मुज्जू शेख हे झाडाखाली बसून उत्तर लिहित होते. महाविद्यालयाच्या कर्मचाºयांना संशय आल्याने त्यांनी चौकशी केल्यावर त्यांच्या मोबाइलमध्ये प्रश्नपत्रिका दिसून आली. त्यानंतर दोघांना पकडून प्राचार्यांच्या कार्यालयात बसवून ठेवले. तसेच ज्या क्रमांकावरून प्रश्नपत्रिकेचा स्नॅप पाठवला, त्याचा डीपी पाहून परीक्षा हॉलची तपासणी केली. तेव्हा शेख अमजद परीक्षा देत असल्याचे दिसले. त्याने हॉलतिकिट फाडून टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, कर्मचाºयांनी त्याच्यासह तिघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
विद्यापीठाकडून पेपर रद्द
विद्यापीठाचे परीक्षा संचालक डॉ.ं दिगंबर नेटके, अधिष्ठाता डॉ. मजहर फारुखी यांनी विद्यार्थ्यांचा रोष पाहून पेपर रद्द केल्याची घोषणा केली.