शाळेची घंटा वाजली; पण जबाबदारी घेणार कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:02 AM2021-09-14T04:02:11+5:302021-09-14T04:02:11+5:30
-- शिक्षण विभागाची सावधगिरी : कोरोना परिस्थितीतील परिणामांवर लक्ष औरंगाबाद : जिल्ह्यात सध्या ५० पेक्षा कमी गावे कोरोनाबाधित असून, ...
--
शिक्षण विभागाची सावधगिरी : कोरोना परिस्थितीतील परिणामांवर लक्ष
औरंगाबाद : जिल्ह्यात सध्या ५० पेक्षा कमी गावे कोरोनाबाधित असून, कोरोनामुक्त गावांतील पाचवी ते बारावीचे प्रत्यक्ष वर्ग भरायला सुरुवात झाली. उपस्थितीही ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. शासनाकडून थोड्या सबुरीने पावले टाकण्याच्या सूचना शिक्षण विभागाला दिल्या आहेत. पुढील पंधरा दिवस काय परिणाम होतात ते पाहून पुढची पावले टाकण्यात येणार असल्याने सध्या ना उपस्थितीचा आढावा, ना शाळा सुरू असल्याच्या स्थितीबद्दलची चर्चा होताना दिसत आहे. त्यामुळे शाळेची घंटा वाजली खरी; पण विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेणार कोण, असा पेच मुख्याध्यापकांसमोर निर्माण झाला आहे.
बहुतांशी इतर जिल्ह्यांत अद्याप पाचवी ते सातवीच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय झालेला नाही. त्यात औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून पाचवी ते सातवीच्या शाळा सुरू झाल्या खऱ्या; मात्र प्राथमिक आणि माध्यमिक विभागाला सध्या पूर्णवेळ शिक्षणाधिकारी नाहीत. त्यात कोरोनाचे सावट अद्याप पूर्णपणे गेलेले नाही. त्यामुळे शाळा आणि शिक्षण विभागाचे काम सध्या ‘आस्तेकदम’ सुरू आहे. आठवी ते बारावीच्या उपस्थितीसंदर्भात १०० टक्के उपस्थितीचा शासन आदेश निघाला आहे. मात्र, प्राथमिक शाळांत विद्यार्थी संख्या वाढत असली, तरी शिक्षक मात्र जुन्या शासन आदेशावरच बोट ठेवून ५० टक्के उपस्थितीनेच शाळेत हजेरी लावत आहेत.
कोणत्या वर्गात किती विद्यार्थी
पहिली - ७७,०६८
दुसरी - ८७,९६२
तिसरी - ८८,५१४
चौथी - ८८,७३८
पाचवी - ८९,९५२
सहावी - ८७,६२५
सातवी - ८६,६७६
आठवी - ८०,४१८
नववी - ७६,२७२
दहावी - ७४,३१४
---
जिल्ह्यात कोरोनामुक्त गावांत शाळा सुरू
---
ग्रामीण भागातील कोरोनामुक्त गावांत आठवी ते बारावीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू झाले. जिल्ह्यातील एकूण १२८ केंद्रांमध्ये आठवी ते बारावीच्या एकूण ९०७ शाळा आहेत. यामध्ये आठवी ते बारावीची एकूण विद्यार्थी संख्या १ लाख २२ हजार ३४९ आहे. त्यापैकी ६३६ पेक्षा अधिक शाळा सुरू आहेत. त्यात दिवसेंदिवस उपस्थिती वाढत असून, ५० टक्केपेक्षा अधिक विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात शिकण्यासाठी येत आहेत.
---
पाचवी ते सातवीचे वर्गही सुरू
---
जिल्ह्यात पाचवी ते सातवीचे वर्ग ६ सप्टेंबरपासून सुरू झाले. सुमारे दोन हजार शाळांतील वर्ग भरायला सुरुवात झाली. मात्र, पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती व शाळा उघडण्यासंदर्भात कोणताही अहवाल शिक्षण विभागाकडून सध्या मागविण्यात येत नाही. रिस्क घेऊन सुरू केलेल्या शाळांत विद्यार्थी सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य दिले जात असल्याचे मुख्याध्यापकांकडून सांगण्यात येते.
---
शाळांकडून अद्याप उपस्थिती किंवा कोणत्या शाळा सुरू झाल्या याबद्दल माहिती मागवली नाही. मात्र, कोरोनामुक्त गावांतील पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले असून, ५० टक्केपेक्षा अधिक उपस्थिती आहे. कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून विद्यार्थी सुरक्षिततेवर अधिक भर दिला जात आहे.
-डाॅ. बी. बी. चव्हाण, प्रभारी शिक्षणाधिकारी (प्रा.), औरंगाबाद