बसअभावी शाळा बंद
By Admin | Published: September 13, 2014 11:12 PM2014-09-13T23:12:47+5:302014-09-13T23:28:05+5:30
नळणी : भोकरदन-नळणी-जाफराबाद ही बस सेवा गत महिनाभरापासून बंद करण्यात आली आहे. परिणामी नळणीच्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
नळणी : भोकरदन-नळणी-जाफराबाद ही बस सेवा गत महिनाभरापासून बंद करण्यात आली आहे. परिणामी नळणीच्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. काहीवेळा बस अभावी विद्यार्थ्यांची शाळा बुडत आहे. बस त्वरित सुरु करावी नसता तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
पूर्वी दिवसभरात भोकरदन-जाफराबाद मार्गावर चार ते पाच बस फेऱ्या होत. परंतु तडेगाव, गारखेडा, टाकळी गावाजवळ रस्त्यावर मोठे खड्डे पडल्यामुळे महामंडळाने या रस्त्यावरील बस बंद केली. भोकरदन ते नळणीपर्यंत रस्ता बस येण्यासारखा आहे. भोकरदन ते नळणीपर्यंत प्रवाशांची वर्दळ देखील चांगली आहे. भोकरदनला जाण्यासाठी विद्यार्थ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. यातून एसटी महामंडळाला चांगले उत्पन्न मिळते. मात्र रस्ता खराब झाल्याच्या नावाखाली या रस्त्यावरील बस सेवा बंद करण्यात आली आहे. भोकरदन हे तालुक्याचे ठिकाण असल्याने ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांना या शहराशी दैनंदिन संपर्क ठेवावा लागतो. परंतु बस सेवा बंद झाल्याने नाईलाजास्तव खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. खराब रस्ता हा तडेगाव-जाफराबाद मार्गावर काही प्रमाणात आहे. भोकरदन, नळणी हा रस्ता बस येण्याजोगा असल्याची माहिती बरंजळा साबळे व नळणीचे सरपंचांनी आगारप्रमुखांना दिलेली आहे. मात्र आगार प्रमुखांनी सरपंचांच्या निवेदनाला केराची टोपली दाखवत बस फेऱ्या बंदच आहेत. आगार प्रमुखांच्या या मनमानी कारभाराला प्रवासी, विद्यार्थी वैतागले आहेत. भोकरदन ते नळणीपर्यंत बस सुरु न केल्यास जाफराबाद येथील आगार प्रमुखाकांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा सरपंच नारायण बाबळे यांनी दिला आहे. (वार्ताहर)