‘त्या’ अपघातग्रस्त स्कूल बसला आरटीओने आॅगस्टमध्येच दिले होते ‘फिटनेस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 12:03 AM2018-12-05T00:03:36+5:302018-12-05T00:04:08+5:30
‘आरटीओ’चाही हातभार : अपघातानंतर ‘फिटनेस’ रद्द करण्याचा सोपस्कार; रस्त्यावर धावणाऱ्या अन्य स्कूल बसची अवस्था शोधण्याची गरज औरंगाबाद : पंढरपूरकडे जाणाºया स्कूल बसची मागील काच निखळल्याने दोन विद्यार्थी रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली. आरटीओ कार्यालयाने या बसला आॅगस्टमध्येच फिटनेस प्रमाणपत्र दिले होते. त्यामुळे स्कूल बसच्या अपघातात आरटीओ कार्यालयाचाही हातभार लागला आहे
अपघातास ‘आरटीओ’चाही हातभार : अपघातानंतर ‘फिटनेस’ रद्द करण्याचा सोपस्कार; रस्त्यावर धावणाऱ्या अन्य स्कूल बसची अवस्था शोधण्याची गरज
औरंगाबाद : पंढरपूरकडे जाणाºया स्कूल बसची मागील काच निखळल्याने दोन विद्यार्थी रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली. आरटीओ कार्यालयाने या बसला आॅगस्टमध्येच फिटनेस प्रमाणपत्र दिले होते. त्यामुळे स्कूल बसच्या अपघातात आरटीओ कार्यालयाचाही हातभार लागला आहे. फिटनेस प्रमाणपत्र देणारे अधिकारी कोण आहेत आणि जिल्ह्यात धावणाºया इतर स्कूलची अवस्था काय आहे, याचा शोध घेण्याची गरज आहे.
आरटीओ कार्यालयाच्या पथकाने अपघातग्रस्त स्कू ल बसची (एमएच-२०, डब्ल्यू ९७५०) मंगळवारी तांत्रिक तपासणी केली. तपासणीदरम्यान काचेसाठी लावलेले रबर कुजल्याचे समोर आले. त्यामुळे या स्कूल बसचे योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस) रद्द करण्यात आले. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते, मोटार वाहन निरीक्षक रवींद्र यादव, आरती देसाई यांनी ही तपासणी केली. तपासणीदरम्यान फिटनेस आणि अन्य कागदपत्रे वैध असल्याचे आढळून आले; परंतु पीयूसी नव्हते. बसची काच नेमकी कोणत्या कारणामुळे निखळली, याची तपासणी केली. तेव्हा काच बसविण्यासाठीचे रबर पॅकिंग खराब झालेले निदर्शनास आले. अगदी हाताने ओढल्यानंतर हे रबर तुटत असल्याचे आढळले.
या बसची २००८ मध्ये नोंदणी झालेली आहे. दहा वर्षे झालेल्या बसला आॅगस्टमध्येच फिटनेस तपासणी करून प्रमाणपत्र देण्यात आले होते. विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक होण्यासाठी बसमधील खिडक्यांची रचना, सुरक्षेसाठी लावण्यात येणारे ग्रील, पायºयांची उंची, अग्निशमन सुविधा आदींची पाहणी केली जाते; परंतु फिटनेस तपासणीच्या अवघ्या तीन महिन्यांनंतरच या बसची काच निखळून अपघाताची घटना घडली. त्यामुळे स्कूल बसच्या तपासणीकडे किती गांभीर्याने पाहिले जाते, हेदेखील समोर आले आहे. त्यामुळे झालेल्या अपघाताला आरटीओ कार्यालयदेखील दोषी असल्याचे दिसते.
स्कूल बसची तपासणी करणार
तांत्रिक पाहणीनंतर संबंधित बसचे फिटनेस प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेले आहे. क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्यासंदर्भात पोलिसांकडून अहवाल आल्यास बसचा परवाना निलंबित केला जाईल, शिवाय क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया स्कूल बसची तपासणी करून कारवाई केली जाईल, असे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांनी सांगितले.
जिल्ह्यात १८८७ स्कूल बस
जिल्ह्यातील १ हजार ८८७ स्कूल बस असल्याची आरटीओ कार्यालयात नोंद आहे. यामध्ये ३३२ स्कूल बस शाळेच्या मालकीच्या आहेत, तर १५५५ स्कूल बस खाजगी मालकांच्या आहेत. या सर्व वाहनांतून दररोज हजारो विद्यार्थ्यांची वाहतूक होत आहे. आरटीओ कार्यालयाने फेब्रुवारीत कारवाईचा बडगा उगारला होता. तेव्हा तब्बल १०६ स्कूल बसचे परवाने चार महिन्यांसाठी निलंबित केले; परंतु या कारवाईनंतरही अनेक बसमालकांनी आरटीओ कार्यालयात येण्याचे टाळले आहे. या बससह फिटनेस प्रमाणत्र घेणाºया बसची खरी अवस्था काय, याची गांभीर्याने पाहणी करण्याची वेळ आली आहे.
केवळ १९७ शाळांमध्ये स्कूल बस समित्या
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी शाळांमध्ये परिवहन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत; परंतु बहुतांश शाळांनी समित्या स्थापन करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. आरटीओ कार्यालयात अवघ्या १९७ समित्यांची नोंद आहे. या समित्यांमुळे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिवाय जिल्हास्तरीय समितीच्याही वर्षभरात केवळ १५ बैठका झालेल्या आहेत.