‘स्कूल चले हम’! सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना; अर्ज कधी व कोठे करायचा?
By विजय सरवदे | Published: June 20, 2024 06:01 PM2024-06-20T18:01:34+5:302024-06-20T18:01:50+5:30
पाचवी ते दहावीच्या मुलींसाठी हजारांपर्यंत शिष्यवृत्ती!
छत्रपती संभाजीनगर : मागासवर्गीय समाजातील मुलींचे शाळेतील गळतीचे प्रमाण कमी व्हावे, शिक्षणात मुलींची संख्या वाढावी, या उद्देशाने पाचवी ते दहावीपर्यंतच्या मुलींसाठी ‘सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती’ सुरू करण्यात आली आहे. या शिष्यवृत्ती योजनेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, शालेय शिक्षणात मुलींचे प्रमाणही वाढले आहे.
मुलीला शिकवून तरी काय उपयोग? मुलगी दुसऱ्याच्या घरचे धन होणार आहे, या मानसिकतेतून वयात येण्याअगोदरच मुलींचा बालविवाह लावून देणे, अर्ध्यातच मुलींना शाळेतून काढून टाकणे, असा कल पालकांचा वाढला होता. ही मानसिकता बदलण्यासाठी शासन वेगवेगळ्या योजना राबवत असून, त्यास आता बऱ्यापैकी यश येत आहे. त्यापैकी सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना ही वरदान ठरत आहे. जिल्ह्यातील हजारो मुलींना या शिष्यवृत्ती योजनांचा लाभ मिळत असून, पालकांवर मुलींच्या शिक्षणावर होणार खर्चही कमी होत आहे. सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती ही पाचवी ते दहावीतील अनुसूचित जाती, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील मुलींना दिली जाते. मात्र, यासाठी लाभार्थी विद्यार्थिनीची किमान ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. पाचवी ते सातवीतील विद्यार्थिनींना ६०० रुपये, तर आठवी ते दहावीतील विद्यार्थिनींना १ हजार रुपये प्रतिवर्षाला दिले जातात.
काय आहे सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना?
प्रामुख्याने मागासवर्गीय प्रवर्गातील शालेय विद्यार्थिनींची शिक्षणातील गळती रोखून शाळेत मुलींची संख्या वाढावी आणि मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य मिळावे, या हेतूने शासनाने सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे.
५वी ते ७वीपर्यंत ६००, तर वरच्या वर्गाला हजार रुपये
या शिष्यवृत्ती योजनेंतर्गत पाचवी ते सातवीतील विद्यार्थिनींना ६०० रुपये, तर आठवी ते दहावीतील विद्यार्थिनींना १ हजार रुपये प्रतिवर्षाला दिले जातात.
निकष काय?
या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थिनीची शाळेतील किमान ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य, हाच एकमेव निकष आहे.
कागदपत्रे काय लागतात?
राष्ट्रीयीकृत बँकेत खाते, आधार कार्ड, मुख्याध्यापकांचा संबंधित प्रवर्गाचा दाखला, शाळा ही माहिती जमा करून समाज कल्याण कार्यालयाकडे सादर करते.
अर्ज कधी व कोठे करायचा?
या शिष्यवृत्तीसाठी मुख्याध्यापकांना आता ऑनलाइनही अर्ज करता येतो. मात्र, जि. प. समाज कल्याण जिल्हा कार्यालयात ऑफलाइन देखील अर्ज सादर करू शकतात.
गतवर्षी १८ हजार मुलींना लाभ
गेल्या वर्षी या शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनु. जातीच्या इयत्ता ५वी ते ७वीपर्यंतच्या २१७३, तर ८वी ते १०वीपर्यंत ४७४२ विद्यार्थिनी, ओबीसी प्रवर्गाच्या इयत्ता ५वी ते ७ वीपर्यंतच्या १७१६, तर ८वी ते १०वीपर्यंत २३८७ आणि ‘व्हीजेएनटी’च्या ४०७६ अशा एकूण १८ हजार ९८३ मुलींना आर्थिक लाभ देण्यात आला.