जि़प़ शाळांचा पट घटला; ३९ शिक्षक झाले अतिरिक्त
By Admin | Published: January 7, 2017 11:08 PM2017-01-07T23:08:01+5:302017-01-07T23:08:49+5:30
लातूर : ग्रामीण भागात जि़प़ शाळांतील विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस घटत आहे़
लातूर : ग्रामीण भागात जि़प़ शाळांतील विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस घटत असून, इंग्रजी शाळा ग्रामीण भागात उघडल्यामुळे त्याचा परिणाम जि़प़ शाळांवर झाला आहे़ गतवर्षी पहिली ते सातवीपर्यंत १ लाख ४ हजार विद्यार्थ्यांचा पट होता़ यंदा ९८ हजार ६०० विद्यार्थ्यांचा पट असून यंदा ५ हजार ४०० विद्यार्थ्यांची संख्या जि़प़ शाळांतून कमी झाली आहे़ परिणामी, जिल्ह्यात ३९ शिक्षक अतिरिक्त झाले आहेत़
लातूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १२३५ शाळा आहेत़ या शाळांत पहिली ते सातवीपर्यंत ९८ हजार ६०० विद्यार्थी असून, गतवर्षी एवढ्याच शाळांमध्ये १ लाख ४ हजार विद्यार्थी होते़ यंदा ५ हजार ४०० विद्यार्थी घटले आहेत़ ग्रामीण भागामध्ये इंग्रजी शाळांचे पेव फुटले आहे़ त्यामुळे जि़प़ शाळांतील विद्यार्थी संख्येवर त्याचा परिणाम झाला आहे़ त्यातच संच मान्यतेबाबतचाही निर्णय नवा आला आहे़ ३० विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक असे धोरण आहे़ ६० विद्यार्थ्यांमागे २ तर ६१ विद्यार्थ्यांमागे ३ शिक्षक असे नवीन धोरण आले आहे़ या धोरणामुळेही अतिरिक्त शिक्षक होण्याचे प्रमाण वाढत आहे़ विद्यार्थी संख्या कमी होत आहे़ शिवाय, विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक संच मान्यता असे धोरण आल्यामुळे अतिरिक्तचाही घोळ वाढत आहे़ अतिरिक्त शिक्षक होत असले तरी लातूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये १०० पेक्षा अधिक शिक्षकांच्या जागाही रिक्त आहेत़
शिक्षक अतिरिक्त होऊ नयेत म्हणून पूर्वीप्रमाणे ग्रामीण भागातील शाळांसाठी वर्ग व तुकडीला २० पट संख्या व शहरासाठी २५ पट संख्या ठेवावी, अशी मागणी करण्यात येत आहे़ मात्र शासनाने संच मान्यतेचा आदेश मागे घेतलेला नाही़ शिवाय जिल्हा परिषदेतील विद्यार्थीसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत़ त्यामुळे दरवर्षी जि़प़ शाळांतील विद्यार्थ्यांचा पट कमी होत आहे़
१२३५ शाळांपैकी जवळपास ३० ते ३५ शाळा एक शिक्षकी झाल्या आहेत़ केवळ विद्यार्थी संख्या रोडावत असल्यामुळे तीन शिक्षक, दोन शिक्षकी शाळा एक शिक्षकावर आल्या आहेत़ ज्ञान रचनावादी, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र असे अनेक उपक्रम शासनामार्फत राबविण्यात येत असले तरी विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्याचे प्रयत्न होताना दिसत नाहीत़