जटवाडा रोडवरील शाळेचे अतिक्रमण जमीनदोस्त; २० अनधिकृत दुकानेही काढली
By मुजीब देवणीकर | Published: November 8, 2023 12:40 PM2023-11-08T12:40:44+5:302023-11-08T12:41:17+5:30
जटवाडा रोडवरील अतिक्रमणे महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने जमीनदोस्त केली.
छत्रपती संभाजीनगर : जटवाडा रोडवरील सारा वैभव सोसायटीसमोरील विंचेस्टर इंग्रजी शाळेने ७० बाय १० या आकारात अतिक्रमण केले होते. सिमेंटचे पोल, जाळी लावून रस्त्यावर हे अतिक्रमण होते. परिसरातील नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर महापालिकेने शाळेला नोटीस दिली. शाळेचा खुलासा समाधानकारक नसल्यामुळे मंगळवारी अतिक्रमण हटाव विभागाने कारवाईचा बडगा उगारला. या भागातील अन्य २० अतिक्रमणेही काढण्यात आली.
अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी शाळेने केलेल्या अतिक्रमणाची स्थळ पाहणी करून संस्थाचालक अफसर नवाब खान यांना अतिक्रमण काढून घ्यावे अशी विनंती केली होती. संस्थाचालक यांनी माझ्याकडे परवानगी आहे, जागा माझीच आहे, असे उत्तर दिले होते. त्यांना महानगरपालिका अधिनियम २६० अन्वये नोटीस दिली. खुलासा समाधानकारक नसल्यामुळे मंगळवारी सकाळी १०:३० वाजता कारवाई करून अतिक्रमित परिसर स्वच्छ करण्यात आला. याच भागातील मुख्य रस्त्यावर शेड, मांस विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. त्यांच्याविरुद्धही कारवाई करण्यात आली. दहा बाय पंधरा, दहा बाय दहा आकाराचे शेड उभारले होते. सामान्य नागरिकांना अतिक्रमणांचा त्रास सहन करावा लागत होता.
याबाबतही मनपाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. हर्सूल कारागृह ते जटवाडा रस्त्यावर काहींनी लोखंडी टपऱ्या टाकून व्यवसाय सुरू केले होते. मंगळवारी ही अतिक्रमणेही काढण्यात आली. प्रशासक जी. श्रीकांत यांनी यापूर्वी पाहणीप्रसंगी कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. ही कारवाई उपायुक्त सविता सोनवणे यांच्या उपस्थितीत पदनिर्देशित अधिकारी अशोक गिरी, अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशेद, प्राणी संग्रहालयाचे डॉ. शाहेद शेख, त्यांचे सर्व कर्मचारी यांच्या पथकाने केली.