शालेय मुलींना सायकलींची प्रतीक्षा

By Admin | Published: July 14, 2017 12:21 AM2017-07-14T00:21:12+5:302017-07-14T00:23:45+5:30

नांदेड : रक्कम विद्यार्र्थिनींच्या खात्यावर वर्ग झाली नसल्याने १०२० पात्र लाभार्थी विद्यार्थिनींना सायकलीची प्रतीक्षा करावी लागत आहे़

School girls wait for bicycles | शालेय मुलींना सायकलींची प्रतीक्षा

शालेय मुलींना सायकलींची प्रतीक्षा

googlenewsNext

श्रीनिवास भोसले।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जिल्ह्यातील नऊ तालुक्यांचा मानव विकास कार्यक्रमामध्ये समावेश करण्यात आला आहे़ या कार्यक्रमाअंतर्गत शालेय विद्यार्थिनींना सायकल देण्यासाठी २०१६-१७ मध्ये मागविलेल्या प्रस्तावांना जिल्हा नियोजन समितीमार्फत प्रशासकीय मान्यता देऊन शिक्षण विभागाकडे निधी वर्ग करण्यात आला आहे़ परंतु, शिक्षण विभागाच्या उदासीनतेमुळे आजपर्यंत सदर रक्कम विद्यार्र्थिनींच्या खात्यावर वर्ग झाली नसल्याने १०२० पात्र लाभार्थी विद्यार्थिनींना सायकलीची प्रतीक्षा करावी लागत आहे़
मानव विकास निर्देशांकानुसार जिल्ह्यातील ९ तालुक्यांची मानव विकास कार्यक्रम राबविण्यासाठी २०१३-१४ मध्ये निवड केली़ तेव्हापासून या तालुक्यात शिक्षण, आरोग्यासंदर्भात विविध योजना राबविण्यात येतात़ या योजनांवर शासन लाखो रूपये खर्च करते़ परंतु, प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे प्रत्यक्ष लाभ होण्यासाठी विलंब लागतो़ निवड झालेल्या तालुक्यातील शाळांकडून आठवी ते दहावीच्या गरजू विद्यार्र्थिनींचे सायकलीसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते़ ज्या गावातून शाळेत जाण्यासाठी बसची व्यवस्था नाही, शाळेचे अंतर पाच ते सहा किलोमीटर आहे़ अशा गावातील विद्यार्थींनीचे प्रस्ताव मुख्याध्यापक, गटशिक्षण अधिकारी, शिक्षण विभागामार्फत जिल्हा नियोजन समितीकडे आले होते़ या प्रस्तावाची तपासणी करून जिल्हास्तरीय समितीने मागील वर्षात म्हणजेच २०१६-१७ मध्ये १ हजार २० सायकली मंजूर करण्यात आल्या़ यामध्ये लोहा तालुक्यासाठी १५१, बिलोली-३६, भोकर - १५५, देगलूर - २८१, धर्माबाद - १५०, किनवट - ९३, हिमायतनगर - १५, उमरी - १३६ तर किनवट तालुक्यातील तीन विद्यार्थिंनी सायकलीसाठी पात्र ठरल्या आहेत़ सदर सायकल खरेदीसाठी लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट २ हजार रूपये निधी वर्ग केला जातो आणि सायकल खरेदीनंतर १ हजार रूपये असे एकूण ३ हजार रूपये दिले जातात़
सायकल खरेदीसाठीच्या पहिल्या टप्प्यातील रक्कम ३० लाख ६० हजार रूपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीने गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे वर्ग केला़ हा निधी शिक्षण विभागामार्फत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर टाकला जातो़ परंतु, पात्र लाभार्थी मुलींचे बँक खाते नसल्याने अडचणी निर्माण झाल्या़ आजपर्यंत जवळपास ८०० विद्यार्थिनींनी खाते उघडले आहेत़ विद्यार्थिनीच्या खात्यावर निधी जमा झाला तर त्यांचे पालक सायकल खरेदी करू शकतील़ उर्वरित विद्यार्थ्यांचे खाते उघडण्याचे काम सुरू असल्याची शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले़ शैक्षणिक वर्ष जूनपासून सुरू होत असल्याने विद्यार्थिंनींना मे अथवा जूनच्या पहिल्या आठवड्यात सायकली मिळाल्या तर त्याचा योग्य लाभ होईल़

Web Title: School girls wait for bicycles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.