शहरात ३ जानेवारीपर्यंत शाळांना सुटी
By | Published: November 22, 2020 09:01 AM2020-11-22T09:01:16+5:302020-11-22T09:01:16+5:30
औरंगाबाद : राज्य शासनाने माध्यमिक विभागाच्या शाळा सुरू करण्यासंदर्भातील निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपविला. महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी ३ ...
औरंगाबाद : राज्य शासनाने माध्यमिक विभागाच्या शाळा सुरू करण्यासंदर्भातील निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपविला. महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी ३ जानेवारी २०२१ पर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत अनुपस्थित राहण्याची मुभा दिली. शनिवारी दुपारी प्रशासकांनी हा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची सूट देण्यात आली असली तरी शिक्षकांना ऑनलाईन शिक्षण देण्याची सूचना करण्यात आली आहे.
शहरात इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी पालिकेच्या शिक्षण विभागाने तयारी सुरू केली. शिक्षकांची कोरोना तपासणी, वर्गखोल्यांचे सॅनिटायझेशन करून घेण्यात आले. मात्र, मागील तीन दिवसांपासून शहरात कोरोनाचे रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली आहे. तीनच दिवसांत ४०४ रुग्ण नव्याने आढळले आहेत. त्यामुळेच शाळा सुरू करायच्या की नाही, असा पेच पालिका प्रशासनासमोर निर्माण झाला होता. शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरू करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशा सूचना केल्या. शहरात शाळा सुरू करण्यासंदर्भात पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी शनिवारी दुपारी घोषणा केली. विद्यार्थ्यांना ३ जानेवारीपर्यंत शाळेत गैरहजर राहण्यास त्यांनी मुभा दिली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
शिक्षकांना दररोज शाळेत यावे लागेल
शहरात माध्यमिकच्या ३६१ शाळा आहेत. मनपा प्रशासक पाण्डेय यांच्या आदेशानुसार विद्यार्थी शाळेत येणार नसले तरी शाळा सुरू होणार आहेत. शिक्षकांना शाळेत यावे लागणार असून, ऑनलाईन शिकवणीदेखील घेण्याचे सूचित करण्यात आले आहे.
पुणे, मुंबईनंतर औरंगाबाद
पुणे, मुंबईनंतर औरंगाबाद शहरात माध्यमिकच्या शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना आजाराची दुसरी लाट येणार असे संकेत शासनाकडूनच देण्यात येत आहेत त्यामुळे मागील आठ ते दहा दिवसांपासून पालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण होते. प्रशासनाने आज घेतलेल्या निर्णयामुळे पालकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.