रिक्त जागांमुळे शाळेला कुलूप
By Admin | Published: August 26, 2016 12:20 AM2016-08-26T00:20:17+5:302016-08-26T00:40:10+5:30
तीर्थपुरी : येथील जिल्हा परिषद प्रशालेत शिक्षकांच्या जागा तसेच मुख्याध्यापकपद रिक्त असून, गणित व इंग्रजी या विषयाच्या शिक्षकांची प्रतिनियुक्ती करून शाळेतील
तीर्थपुरी : येथील जिल्हा परिषद प्रशालेत शिक्षकांच्या जागा तसेच मुख्याध्यापकपद रिक्त असून, गणित व इंग्रजी या विषयाच्या शिक्षकांची प्रतिनियुक्ती करून शाळेतील विद्यार्थ्यांची समस्या सोडवावी या मागणीसाठी शिवबा मित्र मंडळाच्या वतीने शाळेला कुलूप ठोकले आहे. जोपर्यंत शिक्षक येणार नाही, तोपर्यंत कुलूप उघडले जाणार नाही, अशी भूमिका घेतली.
तीर्थपुरी येथील जि.प. शाळेत वर्ग ५ ते १० वीपर्यंत शाळा आहे. सर्व मिळून ११ तुकड्या आहेत. विद्यार्थीसंख्या जवळपास ५५८ असताना या शाळेत १६ शिक्षकांच्या जागा मंजूर व मुख्याध्यापकपद मंजूर असताना केवळ १३ आहे. त्यातील गणित विषयाचे खान व इंग्रजी विषयाचे क्षीरसागर यांची अंबड तालुक्यातील जामखेड येथे प्रतिनियुक्ती सोयीनुसार बदली करण्यात आली. त्यामुळे या शाळेत महत्वाच्या विषयांसाठी शिक्षक नाहीत. यामुळे शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. याबाबत शिवबा मित्र मंडळाच्या वतीने १६ आॅगस्ट रोजी गटशिक्षणाधिकारी घनसावंगी यांना त्वरित शिक्षक द्या, नसता १० दिवसांनी शाळेला कुलूप ठोकले जाईल, असे लेखी निवेदन दिले.
शाळेच्या मुख्याध्यापक पिराने यांनीही वरिष्ठांना कळविले होते. पण वरिष्ठांनी कोणतीच दखल घेतली नाही. त्यामुळे गुरुवारी शिवबा मित्र मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी सर्व विद्यार्थ्यांना बाहेर जाण्यास सांगून शाळेला कुलूप ठोकले. शिवबा मित्र मंडळाचे अध्यक्ष रमेश बोबडे, अशोक कोकाटे, माऊली बोबडे, आकाश तापडिया, शिवाजी गायकवाड, दीपक तोतला आदींची यावेळी उपस्थिती होती.