मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर भरविली शाळा
By Admin | Published: June 15, 2017 11:28 PM2017-06-15T23:28:20+5:302017-06-15T23:33:00+5:30
परभणी : मानवत तालुक्यातील सारंगापूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक उपलब्ध करून द्यावेत, या मागणीसाठी येथील ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी खोडवेकर यांच्या दालनासमोरच शाळा भरविली़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : मानवत तालुक्यातील सारंगापूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक उपलब्ध करून द्यावेत, या मागणीसाठी येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांच्या दालनासमोरच गुरुवारी शाळा भरविण्यात आली़ जवळपास ५ तास चाललेल्या आंदोलनामध्ये ३ शिक्षकांची नियुक्ती करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले़
सारंगापूर येथील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळेमध्ये मुख्याध्यापक, प्राथमिक पदवीधर ३ व प्राथमिक शिक्षकांची ५ अशी ९ पदे मंजूर आहेत़ त्यापैकी मुख्याध्यापक व प्राथमिक शिक्षकांची ४ पदे कार्यरत होती. मागील तीन वर्षामध्ये येथून तीन शिक्षक बदलून गेल्याने दोनच शिक्षक कार्यरत आहेत़ १५ जून रोजी शाळा सुरू होणार असल्याने त्यापूर्वी शाळेवर शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली होती; परंतु, या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने पालक व विद्यार्थ्यांनी गुरूवारी जिल्हा परिषद गाठली. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांच्या दालनामध्ये त्यांची भेट घेण्यासाठी पालक व विद्यार्थ्यी थांबले होते़ परंतु, खोडवेकर यांनी त्यांची भेट घेणे टाळले़ पालक मात्र खोडवेकर यांच्याशी चर्चा करण्यावर ठाम होते़ पालक व विद्यार्थी आक्रमक होत असल्याचे पाहून एका कर्मचाऱ्याने खोडवेकर यांच्या दालनास बाहेरून कुलूप लावून घेतले़ विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याऐवजी खोडवेकर हे त्यांच्या दालनामध्येच बसून होते़ त्यामुळे पालक व विद्यार्थी आणखी आक्रमक झाले़ त्यांनी दालनासमोरच राष्ट्रगीत सुरू केले़ त्यानंतर पाढे म्हणण्यास सुरुवात केली़ तरीही खोडवेकर हे भेटण्यास येत नसल्याने विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी सुरु केली़ यावेळी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड हेही कर्मचाऱ्यांसमवेत हजर झाले़ तसेच ही माहिती आ़ राहुल पाटील यांना समजताच त्यांनी जिल्हा परिषदेकडे धाव घेतली़ तर जि. प. सदस्य समशेर वरपूडकर, प्रभू जैस्वाल हेही दाखल झाले़ आ़ राहुल पाटील आल्यानंतर सीईओ खोडवेकर यांच्या दालनाचे कुलूप उघडण्यात आले़ बंद दरवाज्याआड आ़ पाटील व खोडवेकर यांच्यामध्ये चर्चा झाली़ त्यांच्या चर्चेमध्ये नेमके काय ठरले हे मात्र समजू शकले नाही़ दरम्यान, उपशिक्षणाधिकारी नासेर खान, उपमुख्य कार्यकारी अधिकारी देसाई यांनी विद्यार्थी व पालकांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली़ तसेच शाळेला शिक्षक उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही दिली़ परंतु, पालक व विद्यार्थ्यांनी जोपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर हे प्रत्यक्ष चर्चा करणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाहीत, अशी भूमिका घेतली़ काही वेळ थांबल्यानंतर आ. पाटीलही रागाने जि. प. तून निघून गेले. ते गेल्यानंतरही काही वेळ विद्यार्थी कक्षासमोर बसून होते़ शेवटपर्यंत खोडवेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला नाही.