लोकवर्गणीतून शाळा डिजिटल
By Admin | Published: July 7, 2016 11:39 PM2016-07-07T23:39:59+5:302016-07-07T23:42:17+5:30
सुनील चौरे, हदगाव चिंचगव्हाण येथील जिल्हा परिषदेची केंद्रीय शाळा लोकवर्गणीतून व शिक्षकाच्या मदतीने संगणकीकृत झाली़
सुनील चौरे, हदगाव
चिंचगव्हाण येथील जिल्हा परिषदेची केंद्रीय शाळा लोकवर्गणीतून व शिक्षकाच्या मदतीने संगणकीकृत झाली़
केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे, या उक्तीप्रमाणे गतवर्षी जून ते एप्रिल या १० महिन्यात ९८ शाळा डिजिटल करण्यात आल्या़ यामध्ये सभापती बालासाहेब कदम, तत्कालीन गटशिक्षणाधिकारी बी़वाय़ येरपुलवार, सूर्यकांत बाच्छे यांचे विशेष योगदान होते़ खरे तर १०० वी शाळा डिजिटल करण्याचा मान तळणी येथील शाळेला पालकमंत्र्यांच्या हस्ते १ मे ला होणार होती़ पण ऐनवेळी कार्यक्रम रद्द झाला आणि हा क्रमांक चिंचगव्हाणच्या शाळेने मिळविला़ लोकवर्गणीतून १ लाख ९० हजार रुपये निधी जमा करून शाळेची रंगरंगोटी, बोलक्या भिंती, ज्ञानरचनावादाचे साहित्य व डिजिटलचे साहित्य शाळेने घेतले़
येथील श्क्षिक अमीर शेख यांनीही शाळेला इतर शाळेच्या तुलनेत टिकविण्यासाठी प्रयत्न केले़ सध्या युगच तंत्रज्ञानाचे आहे़ त्यामुळे विद्यार्थी पुस्तक, वह्याऐवजी या यंत्रामुळे जास्त एकरूप होतात़ इतिहास अथवा विज्ञान याचे वेगवेगळे प्रयोग अॅपस्वरून डाऊनलोड करून विद्यार्थ्यांना दाखविल्यामुळे त्यांच्या आकलन क्षमतेत वाढ होते व ते शाळेला दांडी मारण्याचे टाळतात़ तंत्रज्ञान वापरण्याची कला शिकवितात़ त्यामुळे विद्यार्थी व शिक्षक यांच्यात मैत्री होते़ याचा चांगला परिणाम शाळेच्या गुणवत्तेवरही होतो़
आतापर्यंत झालेल्या डिजिटल शाळेमध्ये विद्यार्थ्यांची गळती थांबली आहे़ अवघड शब्द, मोठमोठ्या संख्या, विद्यार्थी ज्ञानरचनावादच्या साहित्यामुळे न अडखडता वाचू लागली आहेत़ यामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांनाही समाधान मिळत आहे़ या कार्यक्रमाला आ़नागेश पाटील यांनी मार्गदर्शन केले व संरक्षण भिंतीसाठी निधी देण्याचे आश्वासन दिले़ सभापती बालासाहेब कदम, जि़प़सदस्या सुनिता हाराळे, पंचायत समिती सदस्या पूष्पा देशमुखे, लांडगे, माजी जि़प़सदस्य उमेश मामीडवार, उपसरपंच, सदस्य आदी उपस्थित होते़