दहावीच्या निकालास उशीर झाल्यास शाळाच जबाबदार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:05 AM2021-07-01T04:05:32+5:302021-07-01T04:05:32+5:30
निकालाचा काऊंटडाऊन सुरू : ऑनलाइऩ निकाल भरणे व निश्चिती एकाच वेळी करण्याच्या सूचना -- औरंगाबाद : दहावीच्या मूल्यमापन ...
निकालाचा काऊंटडाऊन सुरू : ऑनलाइऩ निकाल भरणे व निश्चिती एकाच वेळी करण्याच्या सूचना --
औरंगाबाद : दहावीच्या मूल्यमापन प्रक्रियेत शाळांच्या गुणदान प्रक्रियेसाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. जिल्ह्यात अशा स्थितीत निकालाला उशीर होऊ नये म्हणून शाळांना निकाल ऑनलाइन भरणे व निश्चितीची कामे प्राधान्याने एकाच वेळी करा, शाळेकडून हलगर्जीमुळे निकाल रखडल्यास पालक गोंधळ घालतील. त्यामुळे कामाला गती देऊन गांभीर्याने करा, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील दहावीच्या ६५ हजार ११ विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेसाठी अर्ज भरले; मात्र परीक्षा रद्द झाल्याने त्यांचे नववीची परीक्षा व दहावीचे मूल्यांकनावर निकाल लावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संगणकीय प्रणालीवर दहावीच्या विद्यार्थ्यांची मूल्यांकनाचा निकाल भरण्यास २३ जुलैला सुरुवात झाली. ६३ हजार ४३९ पैकी आतापर्यंत २० हजार ४६५ जणांची माहिती भरली गेली; मात्र केवळ ४,५६५ विद्यार्थ्यांचे निकाल शाळांनी निश्चित केले. आतापर्यंत गुणदान पूर्ण व अंतिम न झाल्याने प्रमाण ३९ टक्के आहे. शिक्षकांनी निकाल भरुन ते त्याच वेळी निश्चित करण्याचे काम गांभीर्याने करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून शाळांना देण्यात आल्या आहेत.
---
जिल्ह्यातील दहावीतील विद्यार्थी - ६५,०११
--
३९ टक्के काम पूर्ण
---
मूल्याकनानंतर मुख्याध्यापकांच्या उपस्थितीत निकाल २ जुलैपर्यंत भरण्याची अंतिम मुदत आहे; मात्र रविवारी रात्रीपर्यंत केवळ ४,५६५ विद्यार्थ्यांचे निकाल भरुन निश्चिती शाळांकडून करण्यात आली. तर २० हजार ४६५ जणांची माहिती भरली गेली; पण निश्चिती केली नाही. याशिवाय ३८ हजार ४१८ विद्यार्थ्यांचे निकाल अपूर्ण होते. त्यामुळे केवळ ३९ टक्के काम पूर्ण झाले. सोमवार ते बुधवार या काळात निकाल भरण्याला गती मिळाली.
---
निकाल संकलनाला उशीर झालेल्या शिक्षकांना ऑनलाइन भरण्यासाठी वाढवून वेळ मिळाला पाहिजे. पासवर्ड रिसेट करून काहींना उशिरा मिळाला. त्यामुळे शिक्षकांना निकाल भरण्यासाठी दोन-तीन दिवसांची मुदतवाढ मिळाली पाहिजे.
-अनिल देशमुख, मुख्याध्यापक.
---
वेळेत निकालाचे संकलन केले. त्यामुळे निकाल भरण्यात अडचण आली नाही; मात्र ज्यांना अडचणी आल्यात त्यांना मुदतवाढ मिळावी. अभिलेखे सादर करण्यासाठी ३ जून मुदत होती. त्याला ६ तारखेपर्यंत मुदतवाढ मिळाली, हे शिक्षकांना सोयीचे झाले.
-अमरसिंह चंदेल, शिक्षक.
---
जसे निकाल भरल्या जातील तेव्हाच निश्चिती केल्यास निकाल लवकर भरल्या जातील. अन्यथा नंतर तांत्रिक अडचणी आल्यास, शाळेकडून हलगर्जीमुळे निकाल रखडल्यास निकालावर परिणाम होईल. त्यावेळी पालक गोंधळ करतील. शेवटच्या वेळात एकाच वेळी सर्वांनी प्रणालीवर काम केल्यास प्रणालीवर ताणही पडू शकतो. त्यामुळे निकालाचे काम गांभीर्याने आणि प्राधान्याने शाळांनी पूर्ण करावे.
-डाॅ. बी. बी. चव्हाण, माध्यमिक विभाग शिक्षणाधिकारी तथा प्रभारी सचिव, विभागीय परीक्षा मंडळ, औरंगाबाद.