औरंगाबादच्या पंधराशेवर शालेय विद्यार्थ्यांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 12:00 AM2018-02-13T00:00:37+5:302018-02-13T00:00:48+5:30
वारंवार मुदत देऊनही तपासणीकडे दुर्लक्ष करणाºया स्कूल बसवर अखेर आरटीओ कार्यालयाने कारवाईचा बडगा उगारला आहे. तब्बल १०६ स्कूल बसचे परवाने चार महिन्यांसाठी निलंबित केले आहेत. याचा किमान पंधराशेवर विद्यार्थ्यांना फटका बसणार असून, शाळेत ये-जा करण्यासाठी पर्यायी वाहतूक सुविधांची व्यवस्था करण्याची वेळ येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : वारंवार मुदत देऊनही तपासणीकडे दुर्लक्ष करणाºया स्कूल बसवर अखेर आरटीओ कार्यालयाने कारवाईचा बडगा उगारला आहे. तब्बल १०६ स्कूल बसचे परवाने चार महिन्यांसाठी निलंबित केले आहेत. याचा किमान पंधराशेवर विद्यार्थ्यांना फटका बसणार असून, शाळेत ये-जा करण्यासाठी पर्यायी वाहतूक सुविधांची व्यवस्था करण्याची वेळ येणार आहे.
आरटीओ कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात १,५०८ स्कूल बस धावतात. नव्या बसला दोन वर्षांनंतर, तर जुन्या बसला प्रत्येक वर्षी आरटीओ कार्यालयाकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे. त्यानुसार शाळा सुरू होण्यापूर्वी शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक क रणाºया स्कूल बसला ४ ते ३१ मे २०१७ दरम्यान तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार अनेकांनी स्कूल बसची तपासणी करून घेतली. यामध्ये आढळून आलेल्या त्रुटींची पूर्तता करण्याची सूचना देण्यात आली. त्यानुसार अनेकांनी त्रुटींची पूर्तता केली; परंतु जवळपास ३०० स्कूल बस मालकांनी तपासणीकडे दुर्लक्ष केले. तपासणीपासून दूर राहिलेल्या स्कूलबसचालकांसाठी १७ डिसेंबर रोजी स्कूल बसची तपासणी मोहीम राबविण्यात आली; परंतु त्याकडेही स्कूलबसचालकांनी पाठ फिरविली. या दिवशी केवळ तीन स्कूल बसची तपासणी झाली होती. नियमांकडे दुर्लक्ष करून बस रस्त्यावर धावत राहिल्याने अखेर कारवाई झाली.
स्कूल बस सापडेनात
परवाने निलंबित केलेल्या स्कूल बसकडे योग्यता प्रमाणपत्र नाही. तपासणीकडे दुर्लक्ष केल्याने बसमालकांना प्रारंभी परवाने निलंबनाचा इशारा देणारे पत्र पाठविण्यात आले होते. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने परवाने निलंबित केल्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. आरटीओ कार्यालयाच्या पथकाकडून नियमांकडे दुर्लक्ष करणाºया वाहनांवर कारवाई केली जाते; परंतु रस्त्यावर धावणाºया या स्कूल बस सापडत नसल्याचा अजब कारभार पाहायला मिळतो. या बस आढळल्यास जप्त केल्या जातील; परंतु यातील अनेक बस कालबाह्य झाल्याने रस्त्यावर धावत नसल्याची शक्यता व्यक्त करून आरटीओ अधिकारी मोकळे होत आहेत.
पालकांनी सजग राहावे
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी महाराष्ट्र स्कूल बस अधिनियमनानुसार नियमांची पूर्तता करणे आवश्यक आहे; परंतु अनेक स्कूल बसमधून विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक होत नसल्याचा प्रकार निलंबित केलेल्या परवान्यांवरून स्पष्ट होत आहे. शहरातील रस्त्यांवर जुन्या रंगरंगोटी करून केलेल्या स्कूल बसमधून विद्यार्थ्यांची वाहतूक होताना दिसते. चारचाकी वाहनांतून अवैधरीत्या विद्यार्थ्यांना कोंबून बसविले जाते. त्याकडे आरटीओ कार्यालयाचे लक्ष जाताना दिसत नाही. यातून एखाद्याला अपघाताच्या घटनेला सामोरे जाण्यापेक्षा पालकांनी सजग राहून आपल्या पाल्यांसाठी सर्व बाजूंची पडताळणी करून सुरक्षित वाहनांची निवड करण्याची गरज आहे.
शालेय परिवहन समिती
कागदावरच
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी स्कूलबस नियमावली तयार करण्यात आली आहे़, शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा, या उद्देशातून सर्वच शाळांमध्ये शालेय परिवहन समित्या स्थापन करण्याचे आदेश आहे़; परंतु या आदेशाला अनेक शाळांनी केराची टोपली दाखवून परिवहन समितीला ठेंगा दाखविला आहे. दर तीन महिन्याला या समितीची बैठक होणे आवश्यक आहे; परंतु बैठकीची माहिती आरटीओ कार्यालयास कळविलीच जात नाही. त्यामुळे प्रत्येक शाळेसाठी नियुक्त केलेले मोटार वाहन निरीक्षकांना कामकाज पाहता येत नसल्याची माहिती आरटीओ कार्यालयाकडून मिळाली.
...तर परवाना रद्द
तपासणीकडे दुर्लक्ष केल्याने चारचाकी ते बस अशा १०६ स्कूल बसचे परवाने चार महिन्यांसाठी निलंबित केले आहेत. या कालावधीत विद्यार्थ्यांची वाहतूक करता येणार नाही. शिवाय यादरम्यान तपासणी करून त्रुटींची पूर्तता करावी लागेल. अन्यथा परवाने रद्द करण्याची कारवाई केली जाईल.
-रमेशचंद्र खराडे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी
विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
स्कूलबसमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे, अग्निशमन उपकरणे, आसन व्यवस्था, खिडक्यांची, पायºयांची विशिष्ट रचना, वेग नियंत्रक आदी गोष्टी आवश्यक ठरतात; परंतु अनेक स्कूलबस नियम पायदळी तुडवून धावतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येतो. तपासणीकडे दुर्लक्ष करणाºया स्कूलबसमध्ये अनेक त्रुटी राहण्याची शक्यता असते.