अपघात सानुग्रह अनुदानात मिळतात केवळ ७५ हजार रुपये; शालेय विद्यार्थ्यांचा जीव एवढा का कवडीमोल?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 12:25 AM2018-08-29T00:25:09+5:302018-08-29T00:25:52+5:30
अपघातात मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्याच्या कुटुंबियींना शासनाकडून राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत अवघी ७५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
- विजय सरवदे
औरंगाबाद : आजचे विद्यार्थी हे उद्याचे आपल्या देशाचे भविष्य आहे, असे मानले जाते; परंतु हे खरे आहे का. खरे असेल, तर शासन विद्यार्थ्यांच्या आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षेप्रती किती संवेदनशील आहे. अपघातात मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्याच्या कुटुंबियींना शासनाकडून राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत अवघी ७५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. विद्यार्थ्याचा जीव एवढा कवडीमोल आहे का? असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे.
पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अपघात विमा संरक्षण मिळावे, यासाठी सरकार विद्यार्थ्यांचा विमा उतरवीत होते. त्याचा हप्तादेखील सरकारतर्फे भरला जायचा. मात्र, विद्यार्थ्यांना भरपाई देण्याबाबत काही कंपन्यांकडून अनेकदा टाळाटाळ होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शालेय शिक्षण विभागाकडून या योजनेत बदल करण्यात आला आहे. सन २०१३ पासून ‘राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना’ सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत दुर्दैवाने एखाद्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाला, तर त्याच्या आईच्या बँक खात्यात ७५ हजार रुपये, विद्यार्थ्याला कायमचे अपंगत्व (दोन अवयव निकामी झाल्यास) आल्यास ५० हजार रुपये, अपघातात एक अवयव निकामी झालेला असेल, तर ३० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची या योजनेत तरतूद आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमार्फत यासंबंधीच्या प्रस्तावांची पडताळणी करून लाभ दिला जातो.
या समितीत जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक अथवा पोलीस उपायुक्त, माध्यमिक व प्राथमिकच्या शिक्षणाधिका-यांचा समावेश आहे. या समितीची महिन्यातून एक वेळ तरी बैठक आयोजित करावी, अशी शासनाची सूचना आहे; पण याबाबत अधिकारी फारसे गंभीर दिसत नाहीत. या योजनेत विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास देण्यात येणारी आर्थिक मदत ही प्राधान्यक्रमानुसार आई आणि त्यानंतर वडील अथवा भाऊ, बहीण यांना देण्यात येईल. मात्र, अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्याला उपचारासाठी आर्थिक मदतीची या योजनेत तरतूद नाही.
या घटनांतील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत नाही
- आत्महत्येचा प्रयत्न करणे.
- आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वत:ला जखमी करून घेणे.
- गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात.
- अमली पदार्थ्यांच्या सेवनानंतर झालेला अपघात.
- नैसर्गिक मृत्यू.
- मोटार शर्यतीत झालेला अपघात.
उपचारासाठी तरतूदच नाही
यासंदर्भात शिक्षणाधिकारी एस.पी. जैस्वाल यांनी सांगितले की, राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत अपघातात मयत विद्यार्थी, तसेच एक किंवा दोन अवयव निकामी झाले असतील, तर आर्थिक मदत करण्याची तरतूद आहे. अपघातात जखमी विद्यार्थ्यावर उपचारासाठी मात्र या योजनेत तरतूद नाही. जिल्ह्यात सन २०१४ पासून आतापर्यंत २८५ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.
मागील दोन-तीन वर्षांत तरतुदीअभावी लाभ देण्यात आलेला नव्हता.शिक्षणाधिकारी पदाची सूत्रे घेतल्यानंतर मी जवळपास ५० विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला आहे.