गावात रुग्ण सापडल्यास शाळा पुन्हा बंद करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:04 AM2021-07-15T04:04:21+5:302021-07-15T04:04:21+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. ग्रामीण भागात इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत ज्या गावांत ...
औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. ग्रामीण भागात इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत ज्या गावांत शाळा आहे, त्या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळल्यास शाळा पुन्हा बंद करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बुधवारी सांगितले. जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याबाबत पूर्ण आढावा घेऊन शाळा, कोरोना रुग्ण असलेले गावे याची माहिती घेऊन तयारी केल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भाग पूर्वपदावर येण्यासाठी लसीकरण मोहीम वेगाने करण्यावर भर असणार आहे. शहरात लसीकरण होतच आहे; परंतु ग्रामीण भागात लोकसंख्येच्या तुलनेत गती येणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात आजवर ३ लाख ६५ हजार ३६ नागरिकांना पहिला, तर ९७ हजार ८९७ पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे. १८ ते ४४ वयोगटांतील ३२ लाख ८७ हजार ८१४ नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यात मनपा हद्दीतील ११ लाख ७६ हजार ९९९, तर ग्रामीण भागात २१ लाख १० हजार ८१५ नागरिकांना लस देण्याचे नियोजन आहे. यातील ९ लाख ६६ हजार ४९३ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यात पहिला ७ लाख ४३ हजार ६९६ नागरिकांनी पहिला, तर २ लाख २२ हजार ८९७ जणांनी पहिला व दुसरा डोस घेतला आहे.
ग्रामीण भागात लसीकरण वेगाने करणार
शहरासोबतच ग्रामीण भागात लसीकरण मोहीम वेगाने व्हावी यासाठी शहरात एक, तर ग्रामीण भागात दोन डोस होतील, अशा पद्धतीने लसींचा पुरवठा करण्यात येणार असल्याचा दावा जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केला. ग्रामीण भागातील लोकसंख्या शहरापेक्षा जास्त असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.