जिल्ह्यातील पाचवी ते नववीपर्यंतच्या शाळा २० मार्चपर्यंत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:03 AM2021-03-05T04:03:41+5:302021-03-05T04:03:41+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यातील (मनपा क्षेत्र वगळून) पाचवी ते नववीपर्यंतच्या शाळा आणि अकरावीचे वर्ग सुरू असलेली महाविद्यालये २० मार्चपर्यंत बंद ...
औरंगाबाद : जिल्ह्यातील (मनपा क्षेत्र वगळून) पाचवी ते नववीपर्यंतच्या शाळा आणि अकरावीचे वर्ग सुरू असलेली महाविद्यालये २० मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश प्र. जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी गुरुवारी जारी केले आहेत.
जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात ४९ शाळांतील ६१ शिक्षक कोरोनाग्रस्त झाले आहेत. त्यामुळे काही शाळा बंद कराव्या लागल्या होत्या. दहावी आणि बारावी इयत्तेचे वर्ग सोडून पाचवी ते नववी आणि अकरावीचे वर्ग बंद करण्याबाबत गुरुवारी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद सीईओ डॉ. मंगेश गोंदावले यांच्यात बैठक झाली. त्या बैठकीनंतर शाळा बंद करण्याबाबत निर्णय झाला. शिक्षकांना दर आठवड्याला आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढतेच आहे, शिवाय शिक्षकांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा-महाविद्यालात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्यास या संस्था चार दिवस बंद ठेवण्याचे आदेशात म्हटले आहे.
५० टक्के शिक्षकांची उपस्थिती अनिर्वाय
कोरोनामुळे जरी ५ वी ते ९ आणि अकरावी पर्यंतचे वर्ग भरणार नसले तरी शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती अनिवार्य राहणार आहे. तसे सगळेच शिक्षक उपस्थितीत असतात. जिल्ह्यात शाळाबाह्य विद्यार्थी व इतर अभियान सुरू आहेत. त्या कामासाठी शिक्षक आहेत, त्यामुळे त्यांना कामावर यावे लागणार आहे, असे प्र.जिल्हाधिकारी गव्हाणे यांनी सांगितले.
जिल्ह्यात शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी असे
२२१८ पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा आहेत. त्यामध्ये ३ लाख ३८ हजार ७५३ विद्यार्थी आहेत. तर नववी ते बारावी २ लाख ६७ हजार ७१९ विद्यार्थी आहेत. यातील नववी आणि अकरावीचे वर्ग भरणार नाहीत. त्यांना आॅनलाईन शिक्षणाचा पर्याय असणार आहे. ७ हजार ६२३ शिक्षक कार्यरत आहेत. दहावी इयत्तेमध्ये ६५ हजार ११ तर बारावीमध्ये ५५ हजार १७७ विद्यार्थी असून, या विद्यार्थ्यांचे वर्ग नियमित सुरू राहणार आहेत.