विद्यापीठ, महाविद्यालयांमध्ये कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 12:32 AM2018-01-04T00:32:45+5:302018-01-04T00:32:49+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील कोणतेही महाविद्यालय बुधवारी उघडलेच नाही, तर विद्यापीठही सलग दुस-या दिवशी बंद होते. कर्मचारी, विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या सुरक्षिततेसाठी विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील कोणतेही महाविद्यालय बुधवारी उघडलेच नाही, तर विद्यापीठही सलग दुस-या दिवशी बंद होते. कर्मचारी, विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या सुरक्षिततेसाठी विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी दिली.
कोरेगाव-भीमा घटनेच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. यामुळे शहरासह परिसरात शैक्षणिक बंद पाळण्यात आला. विद्यापीठामध्ये बुधवारी विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाºयांनी स्वत:हूनच बंद पाळला. यामुळे दिवसभर विद्यापीठात शुकशुकाट होता. विद्यापीठाची मध्यवर्ती अभ्यासिकाही बंद असल्यामुळे विद्यार्थी वसतिगृहांमधून बाहेरच पडले नाहीत. अनेकांनी वसतिगृहातच बसून राहणे पसंत केले. विद्यापीठ प्रशासनाने पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या होणाºया परीक्षाही रद्द केल्यामुळे परीक्षा भवनातील वातावरणही शांतच होते. नागसेनवनातील महाविद्यालयांमध्ये उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. महाविद्यालये उघडलीच नाहीत. सरस्वती भुवन शिक्षण संस्था, विवेकानंद महाविद्यालय, वसंतराव नाईक महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन, औषध निर्माण, देवगिरी महाविद्यालयही बंदच होते. एक दिवसापूर्वीच बंदची हाक दिलेली असल्यामुळे कोणत्याही महाविद्यालय प्रशासनाने धोका पत्करला नाही. त्याचवेळी विद्यार्थीसुद्धा महाविद्यालयाकडे फिरकले नसल्याचे चित्र विविध शैक्षणिक संकुलांमध्ये दिसून आले. विविध महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारांवर केवळ सुरक्षा रक्षकच आढळून आले.
शहरातील शाळांमध्येही बंद
शहरातील इंग्रजी, मराठी माध्यमांच्या शाळांनी बंद पाळला; मात्र शिक्षण विभागाने कोणत्याही सूचना दिलेल्या नसल्यामुळे काही जि. प. शाळा भरल्या होत्या, तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांना शाळा बंद असल्याचा निरोप पोहोचला नाही. याचा परिणाम अनेक विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन पुन्हा परत यावे लागले. यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना काही काळ धावपळ करावी लागल्याचा प्रकार काही शाळांमध्ये घडला.
कोरेगाव-भीमा घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक दिल्यामुळे काही खासगी संस्थांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून स्वत: शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यात महानगरपालिकेच्या शाळांनाही सुटी देण्यात आली होती; मात्र शिक्षण विभाग आणि शासनाच्या वतीने शाळा बंदचा कोणताही निर्णय देण्यात आला नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे काही विद्यार्थी सकाळी शाळेत गेले होतो; परंतु शाळा बंद होत्या. त्यामुळे आलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी शाळा बंद ठेवली आहे, तुम्ही घरी जा असे सांगितले. आधी निरोप न मिळाल्याने काहींना मनस्ताप सहन करावा लागला. जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांनी सांगितले.
गुरुवारी विद्यापीठाचे कामकाज नियोजित वेळेनुसार सुरू राहणार असल्याची माहिती कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी दिली, तसेच सर्व उपस्थित कार्यक्रम, तासिका, अभ्यासिका, परीक्षा भवन सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.