औरंगाबादमध्ये परिवहन समिती स्थापण्याकडे शाळांचा कानाडोळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 06:33 PM2018-07-05T18:33:01+5:302018-07-05T18:33:41+5:30

शहरासह जिल्ह्यात बहुतांश खाजगी इंग्रजी व इतर माध्यमांच्या शाळांमध्ये परिवहन समित्या अद्याप स्थापनच करण्यात आलेल्या नसल्याचे समोर आले आहे.

Schools in Aurangabad neglect to set up a transport committee! | औरंगाबादमध्ये परिवहन समिती स्थापण्याकडे शाळांचा कानाडोळा!

औरंगाबादमध्ये परिवहन समिती स्थापण्याकडे शाळांचा कानाडोळा!

googlenewsNext
ठळक मुद्देशहर व जिल्ह्यात जवळपास ७९० खाजगी इंग्रजी व इतर माध्यमांच्या शाळा आहेत.

- राजेश भिसे 

औरंगाबाद : शहरासह जिल्ह्यात बहुतांश खाजगी इंग्रजी व इतर माध्यमांच्या शाळांमध्ये परिवहन समित्या अद्याप स्थापनच करण्यात आलेल्या नसल्याचे समोर आले आहे. महिनाभरात या समित्या स्थापन करून त्यांची बैठक घेण्याच्या सक्त सूचना आरटीओ अधिकाऱ्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. 

शहर व जिल्ह्यात जवळपास ७९० खाजगी इंग्रजी व इतर माध्यमांच्या शाळा आहेत. या शाळांमध्ये ने-आण करताना विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची असते. या दृष्टिकोनातून प्रत्येक शाळेत परिवहन समिती स्थापन करावी लागते. सर्वत्र शाळा सुरू होऊन जवळपास महिना होत असला तरी अद्याप बहुतांश शाळांमध्ये या समित्यांची स्थापनाच करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक, विद्यार्थ्यांच्या ने-आण ठिकाणावर लक्ष, बसची भाडे आकारणी, बसमध्ये मदतनीस आहे की नाही, बसची कागदपत्रे व आवश्यक त्या सुविधा, फिटनेस सर्टिफिकेट यावर सध्या तरी कोणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे.

यासाठीच प्रत्येक शाळेत परिवहन समिती स्थापन करणे आवश्यक असते. त्याचबरोबर पार्किंगची व्यवस्था शाळेच्या कॅम्पसमध्येच करावी. रस्त्यावर विद्यार्थ्यांना बसमध्ये बसविणे अथवा उतरविणे धोकदायक ठरते. त्यामुळे शाळांनी कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांच्या बसण्याची व उतरण्याची व्यवस्था यावर लक्ष ठेवण्यासाठी शाळांतील समित्यांची स्थापना केली जाते. दर महिन्याला शाळा समितीची बैठक होणे अपेक्षित असते. याचा अहवाल जिल्हा समितीकडे पाठवावा लागतो. त्यावर जिल्हा समितीची शाळांतील परिवहनाबाबत भूमिका ठरत असते. त्रुटी आढळून आल्यास सुधारणा करण्याची संधी संबंधितांना दिली जाते. त्यानंतरही अपेक्षित बदल घडून न आल्यास योग्य कार्यवाही संबंधितांविरुद्ध केली जात असल्याचे आरटीओ कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. 

बसमालकांनी ‘फिटनेस’करून घ्यावे
जिल्ह्यातील १,५५७ स्कूल बसेसपैकी २४२ बसेस फिजिकली अनफिट असल्याचे  चाचणीत आढळून आले आहे. या बसमालकांनी तात्काळ  सर्टिफिकेटची कार्यवाही पूर्ण करावी. त्याशिवाय शाळांनी या बसेस सेवेत दाखल करून घेऊ नयेत, असे आवाहन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी रमेशचंद्र खराडे यांनी केले आहे. 

शाळांच्या समितीत यांचा समावेश असावा
-शाळेचे मुख्याध्यापक/प्राचार्य
-पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक
-प्रादेशिक परिवहन विभागाचे निरीक्षक
-पालक प्रतिनिधी
-स्कूलबसचालक/मालक प्रतिनिधी
-प्रतिष्ठित नागरिक

जिल्हा स्कूलबस सुरक्षितता समिती
-अध्यक्ष- आयुक्त/पोलीस अधीक्षक
-सदस्य सचिव- प्रादेशिक परिवहन अधिकारी
-सदस्य- वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त
-सदस्य- शिक्षणाधिकारी, माध्यमिक, पूर्व माध्यमिक

Web Title: Schools in Aurangabad neglect to set up a transport committee!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.