ग्रामीण भागातील शाळा सोमवारपासून सुरु; शहरातील विद्यार्थ्यांना ३ जानेवारीपर्यंत सुट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 04:28 PM2020-11-21T16:28:14+5:302020-11-21T16:28:36+5:30
जिल्ह्यात एकही कंटेन्मेंट झोन नाही.
औरंगाबाद : जिल्ह्यात ग्रामीण भागातील शाळा सोमवारपासून सुरु होणार आहेत. तर शहरातील विद्यार्थ्यांना ३ जानेवारीपर्यंत शाळेत अनुपस्थित राहण्याची परवानगी असल्याची माहिती प्रशासनाकडून शनिवारी देण्यात आली. खेड्यात आॅनलाईन माध्यमांची उणीव आहे. शिक्षणात नेटवर्कच्याही समस्या असुन शाळाच शिक्षणाचे चांगले माध्यम आहे. आता जिल्ह्यात कोरोनाचा एकही कंटेन्मेंट झोन नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील ८२४ शाळांत नववी ते बारावीचे वर्ग सोमवार पासून सुरु करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला.
यासंदर्भात जिल्हाधिकारी निवासस्थानी चव्हाण यांनी शनिवारी दुपारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडे, जिल्हा परिषद सीईओ मंगेश गोंदावले, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जयस्वाल, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डाॅ. बी बी चव्हाण यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, शहरी आणि ग्रामीण परिस्थिती व तेथील समस्या वेगळ्या आहेत. ग्रामीणमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या घटत असुन रुग्ण बरे होण्याचा दर ९६ टक्के आहेत. शहरापेक्षा मृत्युदरही कमी आहे. शिक्षणासाठी शाळाच सर्वात उत्तम माध्यम मुलांसाठी असल्याने व आॅनलाईन शिक्षणाच्या साधनांची कमतरता आणि नेटवर्कच्या समस्यांमुळे राज्य शासनाच्या नववी ते बारावीच्या शाळा २३ नोव्हेंबर पासून सुरु करण्याच्या अनुकुल निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी ७१३० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांची तपासणी नियोजनबद्ध पद्धतीने पुर्ण केली जात आहे.
शहरातील विद्यार्थ्यांना ३ जानेवारीपर्यंत सुट
शिक्षकांना तपासणी शिवाय शाळेत जाता येणार नाही. तर पालकांच्या संमतीनेच विद्यार्थ्यांना शाळेत घेतल्या जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ठ केले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष महत्वाचे आहे. मात्र, त्याचे जीवन अमुल्य आहे. बाधितांच्या संख्येतील वृद्धी आणि कोरोनाच्या दुसर्या लाटेची शक्यता याची पडताळणी १० डिसेंबरला करु. शाळा सोमवार पासून सुरु होतील. पण, विद्यार्थ्यांना ३ जानेवारीपर्यंत सुटी दिल्याची माहीती मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडे यांनी दिली. ग्रामीण मध्ये तपासणी झालेल्या शिक्षकांची १०० टक्के उपस्थिती तर शहरात ५० टक्के शिक्षकांची सोमवार पासून उपस्थीती असेल मात्र, तपासणी झालेल्या शिक्षकांची शक्यता लक्षात घेताल सोमवारी ७० टक्केच शिक्षक उपस्थित राहू शकतील असे शिक्षणाधिकारी बी. बी. चव्हाण म्हणाले.
शहरात माध्यमिकच्या ३६१ शाळा
शहरात महापालिकेच्या ७२ शाळा असून, त्यापैकी १७ माध्यमिक शाळा आहेत. इयत्ता नववी, दहावी, अकरावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली होती. शहरात माध्यमिकच्या ३६१ शाळा आहेत. इयत्ता नववी ते बारावी वर्गातील सुमारे ७८ हजार विद्यार्थी घराबाहेर पडणार आहेत. सुमारे साडेतीन हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीदेखील या शाळेत आहेत.