विद्यार्थी सुरक्षेबाबत शाळा अजूनही मागेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 01:19 AM2017-09-19T01:19:01+5:302017-09-19T01:19:01+5:30
‘लोकमत’ने शहरातील शाळांचा आढावा घेतला असता अनेक शाळांमध्ये कर्मचारी व शिक्षकांचे पोलिसांकडून चारित्र्य प्रमाणपत्र आणि सीसीटीव्हीसारख्या मूलभूत सुरक्षा उपाययोजनादेखील केल्या नसल्याचे दिसून आले.
मयूर देवकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : गुरगाव येथील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये दुसरीच्या विद्यार्थ्याच्या हत्येनंतर संपूर्ण देशातील शाळांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र व राज्य प्रशासनाला शाळेमधील सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी सूचना करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने शहरातील शाळांचा आढावा घेतला असता अनेक शाळांमध्ये कर्मचारी व शिक्षकांचे पोलिसांकडून चारित्र्य प्रमाणपत्र आणि सीसीटीव्हीसारख्या मूलभूत सुरक्षा उपाययोजनादेखील केल्या नसल्याचे दिसून आले. विद्यार्थी सुरक्षेबाबत गांभीर्याचा अभाव केवळ शालेय प्रशासनच नाही तर पालकांमध्येही दिसून आला.
शहरातील अनेक शाळांमध्ये उत्तम सुरक्षा व्यवस्था आहे. मात्र अनेक शाळा विद्यार्थ्यांच्या येण्याजाण्याच्या वेळा, शिक्षकांच्या वर्तणुकीबाबत आणि एकंदरीतच विद्यार्थ्यांची सुरक्षा याबाबत शाळा पुरेशा गंभीर नसल्याचे समोर आले. ज्ञानार्जन करण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी शाळेची असून, त्यादृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे.