शाळा आजपासून गजबजणार !
By Admin | Published: June 16, 2014 12:30 AM2014-06-16T00:30:48+5:302014-06-16T01:17:24+5:30
उस्मानाबाद : दोन महिन्याच्या सुट्टीनंतर सोमवारपासून शाळा गजबजणार आहेत. विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी शिक्षण खात्याने केली आहे.
उस्मानाबाद : दोन महिन्याच्या सुट्टीनंतर सोमवारपासून शाळा गजबजणार आहेत. विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी शिक्षण खात्याने केली आहे. रविवारी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती संजय पाटील दुधगावकर यांनी या तयारीचा आढावा घेवून शाळा भेटीचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या. नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक व गणवेश वाटपही केले जाणार आहेत.
नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतामध्ये कुठल्याही स्वरुपाची कसूर राहु नये, यासाठी शिक्षण विभागातील अधिकारी आणि शिक्षक मागील आठवडाभरापासून तयारीला लागले होते. वादळी वाऱ्यामुळे १९ शाळांवरील पत्रे उडून गेले होते. यामध्ये ५ शाळांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. उर्वरित शाळांवर पत्रे टाकण्यात आले असून, काही ठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शाळा बंद असल्यामुळे शाळा परिसरात अस्वच्छता निर्माण झाली होती. अशा शाळांची साफसफाई करुन घेण्यात आली असून, परिसर चक्काचक केला आहे. त्याचप्रमाणे मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या बैठका घेवून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेवून लागलीच उपाययोजना करण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी औदुंबर उकीरडे यांनी सांगितले.
पुस्तक वितरणाचे कामही मागील काही दिवसापासून सुरु होते. हे कामही दोन दिवसापूर्वीच पूर्ण करण्यात आले असून, प्रत्येक शाळावर पुस्तके पोहंच करण्यात आली आहेत. तसेच गणवेशासाठीची तरतूद उपलब्ध न झाल्यामुळे अडचण निर्माण झाली होती. मात्र जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांनी सर्व शिक्षा अभियानच्या अखर्चित रक्कम गणवेशासाठी वापरण्याच्या सूचना करण्यात आल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे ज्या शाळांनी तयारी केली आहे, त्या शाळांवर पहिल्या दिवशीच गणवेश देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, शिक्षण विभागाने यंदा फुलांऐवजी विद्यार्थ्यांना रोपटे देऊन स्वागत करण्याचे निश्चित केले होते. मात्र वरुणराजाने दडी मारल्याने याऐवजी आता विद्यार्थ्यांना फुले देऊन स्वागत करण्याचे निश्चित झाले आहे.
२५६४ नवागतांचा प्रवेश अपेक्षित
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेनुसार किमान २५ हजार ६४ विद्यार्थ्यांना प्रवेश देणे गृहीत धरले आहे. प्रत्यक्ष कितीजण शाळेत दाखल होतात हे सोमवारी समोर येणार असले तरी शिक्षण विभागाने हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या अनुषंगाने आवश्यक ती तयारी केल्याचे सांगण्यात आले.
अध्यक्ष, उपाध्यक्ष देणार भेटी
कर्मचाऱ्यांसोबतच जिल्हास्तरावरून जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत हेही विविध शाळांना भेटी देऊन नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. (प्रतिनिधी)
पथके देणार शाळांना भेटी
सुचित केल्यानुसार शाळांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले आहे की नाही, हे पाहण्यासाठी शिक्षण विभागाने पथके स्थापन केली आहेत. ही पथके एकूण १३ बाबी तपासणार आहेत. यामध्ये नियोजन, शिक्षक उपस्थिती, वार्षिक नियोजन, टाचण काढणे, वर्ग सजावट, फळ्यांची रंगरंगोटी, पुस्तक वाटप, स्वच्छतागृह, किचनशेड, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, मुख्याध्यापक कक्ष अद्ययावत आहे का? प्रयोगशाळा, संगणककक्ष, ग्रंथालय सुस्थितीत आहे का, पोषण आहार, प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचे उद्दिष्ट व पक्ष प्रवेश आणि इयत्तानिहाय पट व उपस्थितीची पाहणी केली जाणार आहे. यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
४३६ नवीन वर्ग
शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) चौथीच्या वर्गाल पाचवीचा तर सातवीच्या वर्गाला आठवीचा वर्ग जोडण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा नव्याने ४३६ वर्ग वाढले आहेत. यामध्ये पाचवीचे २५८ तर आठवीचे १७८ वर्ग आहेत. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पाचवी आणि आठवीच्या शिक्षणासाठी करावी लागणारी पायपीट थांबणार आहे.
कारवाईचा बडगा
शाळावरील मुख्याध्यापक, शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी केलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शिक्षण विभागाने पथके गठित केली होती. त्यानुसार सर्वसंबंधित अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी देवून लागलीच त्रुटींची पूर्तता करुन घेतली. मात्र २४ गुरुजींनी सूचना पाळल्या नाहीत. शाळेवर उपस्थित राहण्याचे सांगूनही त्याकडे कानाडोळा केला. परिणामी त्यांच्यावर कारवार्ईचा बडगा उगारण्यात आला आहे. संबंधितांना नोटिसा दिल्याचे शिक्षणाधिकारी म्हणाले. खुलासा आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.
मुख्याध्यापक, शिक्षकांना सूचना देऊन नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी झाली असून पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येतील.
- औदुंबर उकिरडे,
शिक्षण अधिकारी