सायन्स सिटी ते आंतरराष्ट्रीय स्टेडीयम; मंत्रिमंडळासमोर मनपाचे २ हजार कोटींचे प्रस्ताव
By मुजीब देवणीकर | Published: September 8, 2023 07:29 PM2023-09-08T19:29:45+5:302023-09-08T19:29:58+5:30
सायन्स सिटी, आंतरराष्ट्रीय स्टेडियम, स्ट्रॉम वॉटर, सफारी पार्कसाठी हवा निधी
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला १६ सप्टेंबर रोजी सकाळी मंत्रिमंडळाची बैठक स्मार्ट सिटी कार्यालयात आयोजित केली आहे. बैठकीसमोर महापालिका प्रशासन तब्बल २ हजार कोटींच्या कामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवणार आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे अहमदाबाद, कोलकाताच्या धर्तीवर सायन्स सिटी उभारणे, गरवारे स्टेडियम आंतरराष्ट्रीय दर्जाचे करणे, पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी वेगळी व्यवस्था इ. कामांचा समावेश करण्यात आला आहे.
मंत्रिमंडळ बैठक, मुक्तिसंग्रामनिमित्त महापालिकेकडून तयारी सुरू आहे. मंगळवारी प्रशासक जी. श्रीकांत यांनी आढावा घेतला. मंत्रिमंडळ बैठकीसमोर कोणते प्रस्ताव ठेवायचे, यावर अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. जवळपास २ हजार कोटींच्या विविध विकासकामांचे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश त्यांनी दिले.
आंतरराष्ट्रीय स्टेडियम
गरवारे स्टेडियम येथे क्रिकेटशिवाय विविध ॲथलेटिक्स खेळांची व्यवस्था करण्यासाठी किमान १५० कोटी रुपये लागणार आहेत. २७ एकर जागेवर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान तयार करण्याचा मानस आहे.
मनपाची प्रशासकीय इमारत
मजनू हिल येथील टेकडीवर महापालिकेची प्रशासकीय इमारत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी लागणारी आर्थिक तरतूद शासनाने करावी, अशी मागणी केली जाणार आहे.
रस्ते, ड्रेनेज, स्ट्रॉम वॉटर
शहरातील रस्ते स्मार्ट सिटी, मनपा निधीतून करण्यात येत आहेत. याशिवाय आणखी बरेच रस्ते गुळगुळीत करायचे आहेत. याशिवाय नवीन वसाहतींमध्ये ड्रेनेज यंत्रणा नाही. त्यासाठीही मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी शहरभर स्वतंत्र यंत्रणा हवी.
स्मशानभूमी, खुल्या जागा
शहरातील ४५ पेक्षा अधिक स्मशानभूमींची अवस्था वाईट आहे. त्यांचे नूतनीकरण, आम्हाला खेळू द्या उपक्रमात खुल्या जागा विकसित करण्यासाठी निधी द्यावा, अशी मागणी करण्यात येणार आहे.
जीर्ण पूल, स्मार्ट रोड
मकाई गेट, पाणचक्की गेट आणि चेलीपुरा-फाजलपुरा येथील जीर्ण पुलांसाठी निधी द्यावा, स्मार्ट रोड तयार करण्यासाठी वेगळा निधी द्यावा.
टायगर सफारी पार्क
मिटमिटा येथे २५० कोटी खर्च करून सफारी पार्क उभारणी सुरू आहे. त्यासोबतच टायगर सफारी पार्कचा प्रस्ताव असून, त्यासाठी निधीची मागणी केली जाणार आहे.
आपत्ती व्यवस्थापन, डीपी रोड
आपत्ती व्यवस्थापनासाठी शासनाने विशेष निधी द्यावा, डीपी रोडसाठी वेगळा निधी देण्याची मागणी केली जाणार आहे. याशिवाय आणखी काही विकास कामांचे प्रस्ताव मनपाकडून तयार केले जात आहेत.