अंत्योदय अन्न योजनेला कात्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:42 AM2017-09-27T00:42:23+5:302017-09-27T00:42:23+5:30
एक किंवा दोन सदस्य असलेल्या अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिकाधारकांना योजनेतून वगळून प्राधान्य कुटुंब लाभ योजनेत या लाभार्थ्यांना वर्ग करण्यात येणार आहे. तसेच ३५ किलो धान्याऐवजी यापुढे पाच किलो धान्य मिळणार आहे. त्यामुळे तालुक्यातील १७०० लाभार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. शासनाने आता गोरगरिबांच्या तोंडचा घासही हिरावला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनपेठ : एक किंवा दोन सदस्य असलेल्या अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिकाधारकांना योजनेतून वगळून प्राधान्य कुटुंब लाभ योजनेत या लाभार्थ्यांना वर्ग करण्यात येणार आहे. तसेच ३५ किलो धान्याऐवजी यापुढे पाच किलो धान्य मिळणार आहे. त्यामुळे तालुक्यातील १७०० लाभार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. शासनाने आता गोरगरिबांच्या तोंडचा घासही हिरावला आहे.
दाद्रिय रेषेपेक्षाही गरिब असणाºया लोकांची अन्न ही मुलभूत समस्या निकाली काढता यावी, म्हणून तत्कालीन शासनाने अंत्योदय अन्न सुरक्षा योजना राबविण्याचा निर्णय घेतला. यामध्ये अत्यंत गरिब असलेल्या लाभार्थ्यांचाही समावेश करून २५ किलो तांदूळ ३ रुपये दराने व १० किलो गहू दोन रुपये दराने उपलब्ध करून दिले. यामुळे विधवा, अपंग, कष्टकरी, मजूर व शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला होता. यासाठी केंद्र शासनाच्या वतीने मदत दिली जात होती. आता केंद्र शासनामार्फत अनुदान मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे अंत्योदय योजनेला घरघर लागली आहे. सुरुवातीला बीपीएलधारकांची साखर वाटप बंद केली. तसेच अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना फक्त एक किलो साखर स्वस्त धान्य दुकानातून दिली जात आहे. अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाच्या प्रधान सचिवांनी २१ सप्टेंबरला आदेश काढला. यामध्ये अंत्योदय योजनेत एक किंवा दोन सदस्य असलेल्या अंत्योदय लाभार्थ्यांना बाद करून प्राधान्य कुटुंब लाभ योजनेत समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. यामुळे ३५ किलो ऐवजी पाच किलो धान्य लाभार्थ्यांना मिळणार आहे. सोनपेठ तालुक्यात बीपीएलधारकांची संख्या ५ हजार ७० आहे. तर अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या २ हजार १३५ आहे. या निर्णयाचा तालुक्यातील अंदाजे १७०० लाभार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. परिणामी लाभार्थ्यांसमोर संकट निर्माण झाले आहे.