घाटी रुग्णालयात औषधींसाठी रुग्णांच्या खिशाला कात्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:04 AM2021-01-14T04:04:26+5:302021-01-14T04:04:26+5:30
औरंगाबाद : निदान, उपचार, शस्रक्रियांची सवलत; पण त्यासाठी लागणारी औषधी विकत, अशी सध्या घाटी रुग्णालयाची परिस्थिती झाली आहे. डॉक्टरांनी ...
औरंगाबाद : निदान, उपचार, शस्रक्रियांची सवलत; पण त्यासाठी लागणारी औषधी विकत, अशी सध्या घाटी रुग्णालयाची परिस्थिती झाली आहे. डॉक्टरांनी लिहून दिलेल्या १-२ स्वस्तातल्या औषधी घाटीच्या औषधालयातून मिळतात, तर महागड्या औषधींसाठी रुग्णांना खासगी मेडिकलची वाट धरावी लागत असल्याने औषधांसाठी रुग्णांच्या खिशाला कात्री लागत असल्याचे ‘लोकमत’च्या रिॲलिटी चेकमधून समोर आले.
घाटीतील २५५ अत्यावश्यक औषधांपैकी १०० औषधी संपल्या आहेत. केवळ १२४ प्रकारची औषधी घाटीत सध्या उपलब्ध आहेत. त्यामुळे ओपीडी, अपघात विभागातून चिठ्ठ्यांचा सपाटा सुरू आहे. एचएमआयएसवर नोंदवून दिलेल्या औषधांतूनही निम्मे औषधी औषधालयातून मिळत नसल्याने रुग्ण बुधवारी खासगी औषध दुकांनाची वाट धरत होते. तासभर रांगेत उभे राहून डाॅक्टरांनी तपासल्यावर हाती बाहेरून औषधी आणण्यासाठी चिठ्ठी दिल्याने अनेकांनी औषधी तुटवड्याबद्दल लोकमतकडे संताप व्यक्त केला. काहीजण औषधालयात फार्मासिस्टकडे औषधी मिळवण्यासाठी हुज्जत घालत होते.
दाखल रुग्णांच्या औषधांची याहीपेक्षा गंभीर परिस्थिती आहे. औषधी तुटवड्यामुळे परिचारिका, निवासी डॉक्टरांना रुग्ण, नातेवाइकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याची आपबिती कर्मचाऱ्यांनी सांगितली.
जिल्हा रुग्णालय, आरोग्य उपसंचालक कार्यालय तसेच मनपाच्या आरोग्य विभागाकडूनही औषधांसाठी मदत मिळवून घेत आहोत. तसेच सीएसआर आणि स्थानिक स्तरावरही औषधांची जुळवाजुळव सुरू आहे. मात्र, २० नोव्हेंबरच्या शासन निर्णयानुसार कोविडसाठीही स्थानिक स्थरावर खरेदी करता येणार नाही, तर हाफकिन महामंडळच पुरवठा करणार आहे. सध्या कोविडची ३५ औषधे उपलब्ध आहेत. कोविड आणि नाॅनकोविडमध्ये प्रामुख्याने प्रतिजैविकांचा तुटवडा आहे, अशी माहिती औषध भांडाराच्या प्रमुख डाॅ. माधुरी कुलकर्णी यांनी दिली.
प्रसूतीसाठी आणावे लागते बाहेरून साहित्य
राज्यातील सर्वाधिक प्रसूती होणाऱ्या रुग्णालयांत घाटी अग्रस्थानी आहे. मात्र, घाटीत सध्या सुरू असलेल्या औषधी तुटवड्यामुळे प्रसूतीसाठी आलेल्या महिलांच्या नातेवाइकांच्या हाती प्रसूती, सिझेरिअनच्या साहित्याच्या चिठ्ठ्या दिल्या जात होत्या. साडेचारशे ते नऊशे रुपयांपर्यंतचे मटेरियल, जेली, औषधींची मागणी प्रिस्क्रीप्शनमध्ये होती.
---
रुग्णालय सापडले एजंटांच्या विळख्यात
--
सर्जिकल इमारतीच्या, मेडिसीन विभागाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच खासगी मेडिकल स्टोअर्सच्या एजंटांचा विळखा असल्याने दुचाकीवर घेऊन जाण्यापर्यंतची व्यवस्था या एजंटांकडून करण्यात आली आहे. डाॅक्टरांची वाॅर्डातील भेट आणि त्यानंतर लिहून दिल्या जाणाऱ्या वेळा एजंटांना माहीत असल्याने त्या काळात रुग्णालय एजंटांच्या विळख्यात सापडल्याचे चित्र सकाळी ९ ते १ वाजेदरम्यान पहायला मिळाले.
---
---
कोट
--
साडेसात कोटींचा निधी हाफकिन महामंडळाला वर्ग केला आहे. त्यातून आर्थिक वर्ष २०२०-२१ मधील कुठलीच औषधी घाटीला अद्याप हाफकिनकडून मिळालेली नाही. हाफकिनकडून पुरवठा सुरू होण्यासाठी किमान एक महिना लागणार आहे. तुटवड्याची परिस्थिती हाताळण्यासाठी पर्यायी व्यवस्थेचा प्रयत्न औषधभंडारकडून सुरू आहे. स्थानिक स्तरावर अत्यावश्यक औषधी खरेदी करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
-डाॅ. कानन येळीकर, अधिष्ठाता, घाटी रुग्णालय, औरंगाबाद
---
दोन गोळ्या मिळाल्या,
मलमासाठी बाहेरची चिठ्ठी
---
रमानगर येथील ६३वर्षीय महिला मेडिसीन विभागाच्या ओपीडीतून औषधालयात आली तेव्हा त्यांना दोन प्रकारच्या पाच पाच गोळ्या औषधालयातून दिल्या गेल्या, तर एका स्वतंत्र चिठ्ठीवर लिहून दिलेला मलम आणण्यासाठी त्यांना खासगी मेडिकल गाठावे लागले. ६० रुपयांना तो मलम त्यांना मिळाला.
---
दोन गोळ्या मिळाल्या,
एका गोळीचा भुर्दंड
---
प्रसूतीपूर्व ओपीडीतून आलेल्या शेंद्रा येथील २५ वर्षीय महिला औषधालयाजवळ आल्या. त्यांना रक्तवाढीच्या आणि जीवनसत्त्वाच्या पुढील तपासणीपर्यंतच्या गोळ्या दिल्या गेल्या तर एक प्रकारची गोळी त्यांनाही बाहेरच्या मेडिकलमधून घेण्यासाठी लिहून दिली होती.
---
एक गोळी घाटीतून
मलम खिश्यातून
---
त्वचारोगासंदर्भात ओपीडीतून पोलीस महिला कर्मचारी औषधालयाजवळ आल्या. त्यांना फार्मासिस्टने सिट्रिझीन गोळ्यांच्या तीन स्ट्रीप दिल्या, तर ८० रुपयांचा मलम त्यांना खासगी मेडिकलमधून घ्यावा लागला. नोंदणी शुल्काइतक्याही गोळ्या मिळाल्या नसल्याबद्दल त्रागा त्यांनी व्यक्त केला.