अपहरणाच्या संशयावरून बनकरवाडीत भंगार वेचकाला बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:05 AM2020-12-30T04:05:11+5:302020-12-30T04:05:11+5:30
वाळूज महानगर : ६ वर्षीय चिमुकलीच्या अपहरणाच्या संशयावरून संतप्त जमावाने भंगार वेचकास मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि.२८) सायंकाळी ५ ...
वाळूज महानगर : ६ वर्षीय चिमुकलीच्या अपहरणाच्या संशयावरून संतप्त जमावाने भंगार वेचकास मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि.२८) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास रांजणगावातील बनकरवाडीत घडली. प्रसंगावधान राखत दक्ष तरुणांनी जमावाच्या तावडीतून सुटका केल्याने त्याचा जीव वाचला.
बनकरवाडी परिसरात सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास एक ६ वर्षीय चिमुकली व तिची लहान बहीण घरासमोरील चिंचेच्या झाडाजवळ खेळत होत्या. यावेळी भंगार वेचत-वेचत एक जण या मुलीजवळ आल्यामुळे त्याच्याजवळील भंगाराची गोणी बघून ६ वर्षीय चिमुकली घाबरली.
‘त्या’ चिमकुलीने आरडाओरडा करत घराकडे धूम ठोकली. तिचा आवाज ऐकून घराबाहेर आलेल्या महिलांनी आरडा-ओरडा केल्याने नागरिकांनी त्या भंगार वेचणाऱ्यास पकडले व मारहाण सुरू केली. संतप्त जमावाच्या तावडीतून सुटत तो जिवाच्या अकांताने जोरात पळत सुटला. अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळताच संतप्त जमावाने त्या भंगार विक्रेत्याचा पाठलाग करून मायलान कंपनीसमोर त्यास पकडून पुन्हा मारहाण सुरू केली. हा प्रकार बघताच बबन बेंगाळ, प्रदीप अग्रवाल, नितीन सूर्यवंशी आदींनी प्रसंगावधान राखत त्या भंगार वेचकाची जमावाच्या तावडीतून सुटका करीत त्यास पोलिसांच्या स्वाधीन केले.
गैरसमजातून घडला प्रकार
‘त्या’ भंगार वेचकास पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी त्याची कसून चौकशी केली. चिमुकलीस खायला देत पोलीस निरीक्षक सावंत यांनी तिला बोलते केले. निरागस चिमुकलीने तो माझ्याकडे येत असल्याचे पाहून तो आपल्याला गोणीत टाकून घेऊन जाईल या भीतीमुळे पळ काढल्याचे सांगितले. केवळ गैरसमजुतीने हा प्रकार घडल्याचे समोर आल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला व या अपहरण नाट्यावर पडदा पडला.
-------------------------------