औरंगाबाद-पैठण रस्त्यावर धावतात भंगार पाण्याचे टँकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 10:46 PM2019-06-12T22:46:51+5:302019-06-12T22:47:01+5:30
अनेक पाण्याच्या टँकरचे आयुष्य संपले असून, ते रस्त्यावर सुसाट धावत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे.
चितेगाव : यावर्षी जानेवारीपासूनच तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने पैठण तालुक्यातील प्रत्येक खेड्यापाड्यात पाण्याचे टँकर सुरू असून, हेच टँकर नागरिकांच्या जीवावर बेतत आहेत. अनेक पाण्याच्या टँकरचे आयुष्य संपले असून, ते रस्त्यावर सुसाट धावत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे.
चितेगाव, बिडकिन, फारोळा, कांचवाडी, नक्षत्रवाडी, गेवराई व बोकूड जळगाव या भागात पाण्याचे टँकर मोठ्या प्रमाणावर वाहतूक केला जातो. हे पाण्याचे टँकर प्रादेशिक परिवहन विभागाच्या दृष्टीने अनेक टँकर हे भंगारात जमा करण्यायोग्य आहे. अनेक ट्रॅक्टरवरील पाण्याच्या टँकर अजूनही प्रादेशिक परिवहन विभागात नोंदणी झालेली नसून या टँकर नंबर आलेले नाहीत. तीन वर्षांपासून पाणी माफियांचा पाणी विक्री हा व्यवसाय बनला आहे. नुकतेच मंगळवारी पाण्याच्या चितेगाव टोल नाक्यावर दुचाकीला धडक देऊन एक निष्पाप महिलेचा बळी घेतला.
गेल्या वर्षीही ११ मे २०१८ रोजी पाण्याचे टँकरने प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला धडक देऊन एकाच वेळी नऊ जणांचा बळी घेतला होता. अनेक पाण्याचे टँकरला पाण्याची गळती लागत असल्याने रस्त्यानेच पाणी वाहून जाते. परिणामी रस्त्याने टँकर हेलकावे मारत असल्याने चालकाचा टँकर वरील ताबा सुटला जात आहे.
या भागात सुरू असलेले पासिंग न केलेले व भंगारात जमा करण्यायोग्य टँकरावर प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई करावी, अशी मागणी वाहन चालक व नागरिकांनी केली आहे.