संगणक हाताळणाऱ्या विद्यार्थिनींच्या हाती खुरपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 09:29 PM2018-10-29T21:29:51+5:302018-10-29T21:30:19+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अडीचशेपेक्षा अधिक विद्यार्थिनींच्या हाती प्रशासनाने खुरपे दिले आहे.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अडीचशेपेक्षा अधिक विद्यार्थिनींच्या हाती प्रशासनाने खुरपे दिले आहे. या विद्यार्थिनी कमवा आणि शिका योजनेत काम करतात. ग्रामीण भागातून शिक्षणासाठी आलेल्या या विद्यार्थिनी गावाकडेही खुरपण्याचे काम करीत होत्या. विद्यापीठात आल्यानंतरही त्यांच्या हाती खुरपेच दिले जाणार असेल तर प्रगती कशी होणार? असा सवाल करून या विद्यार्थिनींना कौशल्याधारित कामे देण्याची मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली.
आ. चव्हाण यांनी सोमवारी (दि.२९) सकाळी ८ वाजता विद्यापीठातील उद्यानात कमवा व शिकाच्या कार्यालयाला भेट दिली. तेव्हा या विद्यार्थिनी गवत खुरपत होत्या. यात संगणक, रसायनशास्त्र, तंत्रज्ञान आदी विभागातील विद्यार्थिनीही होत्या. कोणत्याही विभागातील विद्यार्थिनी असल्या तरी त्यांना कौशल्याधारित कामे देण्याऐवजी खुरपण्याचे काम देण्यात आले. या विद्यार्थिनींना काम केल्यानंतर सही करण्यासाठी एक तास रांगेत उभे राहावे लागते. ९.१५ वाजेपर्यंत या विद्यार्थिनी तेथे असतात. यातील अनेक जणींना सोमवारी १० वाजता विभागात परीक्षा देण्यास जायचे होते. तरीही त्यांना लवकर सोडण्यात आले नाही, अशा प्रकारची अमानवी, अमानुष वागणूक आपण विद्यार्थिनींना देत आहोत, याचे भानही प्रशासनाला राहिले नसल्याचा आरोप त्यांनी केला. तत्पूर्वी त्यांनी प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले होते. विद्यार्थिनींच्या वसतिगृहात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. मुली पाण्यासाठी बॉटल घेऊन सर्वत्र फिरतात. एक बाटली पाणी मिळत नाही. एकाही विद्यार्थिनींच्या वसतिगृहात खानावळीची सुविधा नाही. स्वच्छतागृहांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मागील दीड वर्षापासून पिण्याच्या पाण्याची टाकी स्वच्छ केलेली नाही. अनेक मुली आजारी पडलेल्या आहेत. त्यांना तपासण्यासाठी विद्यापीठात एकही महिला वैद्यकीय अधिकार नाही. याविषयीचे निवेदन प्रशासनाला दिले आहे.
दिवाळीनंतर विद्यार्थिनींसह विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत, तर हा प्रश्न आमच्या पद्धतीने सोडविण्यात येईल, असा इशाराही आ. चव्हाण यांनी दिला. यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. फुलचंद सलामपुरे, अधिसभा सदस्य डॉ. स्मिता अवचार, डॉ. राम चव्हाण, प्रा.सुनील मगरे, डॉ. भारत खैरनार, शेख जहूर, विद्यापरिषद सदस्य डॉ. विलास खंदारे यांच्यासह डॉ. संभाजी वाघमारे, अमाले दांडगे, मयूर सोनवणे, अक्षय पाटील, दीक्षा पवार आदी उपस्थित होते.
प्राध्यापकांना बंदी अन् कुलगुरू दौºयावर
विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकाºयांना सुटी घेण्याची, दौºयावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र कुलगुरू प्रभारी अधिकाºयांना घेऊन परदेश दौºयावर कसे जातात? असा सवालही आ.चव्हाण यांनी उपस्थित केला. विद्यापीठात अनेक सेवानिवृत्तांना हजारो रुपये पगार देऊन सल्लागार म्हणून नेमले. हे लोक काय सल्ला देतात. त्यांच्यावर फसवणूक करून पगार उचलतात याबाबत फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी मागणीही आ. चव्हाण यांनी केली.