एसडीओंनी अडविले ५७ तडीपारीचे प्रस्ताव !
By Admin | Published: February 6, 2017 10:56 PM2017-02-06T22:56:59+5:302017-02-06T22:57:49+5:30
लातूर :उपविभागीय अधिकाऱ्यांकडे ५७ तडीपारीचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. मात्र या प्रस्तावांची पडताळणी अद्याप संबंधित अधिकाऱ्यांकडून झाली नाही.
लातूर : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विविध पोलीस ठाण्यांच्या रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर तडीपारीची कारवाई केली जाते. त्यानुषंगाने जिल्हा पोलीस दलाकडून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे ५७ तडीपारीचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. मात्र या प्रस्तावांची पडताळणी अद्याप संबंधित अधिकाऱ्यांकडून झाली नाही. त्यामुळे निवडणूक तोंडावर असतानाही हे प्रस्ताव अद्यापही प्रलंबित आहेत.
लातूर जिल्ह्यातील ५८ जिल्हा परिषद आणि ११६ पंचायत समिती मतदार संघासाठी येत्या १६ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीची तयारी जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. तर जिल्हा पोलीस दलाकडून निवडणूक काळात शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी सहा उपविभागांतून एकूण ५७ तडीपारीचे प्रस्ताव त्या-त्या विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहेत. अहमदपूर, चाकूर उपविभागांतर्गत एकूण १२ प्रस्ताव पोलीस प्रशासनाकडून दाखल करण्यात आले होते. अहमदपूर तालुक्यातून सात प्रस्ताव दाखल केले होते. यातील चार प्रस्ताव फेरचौकशीसाठी पुन्हा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहे. तीन प्रस्तावांवर नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सातपैकी एकाही प्रस्तावांवर तडीपारीची कारवाई अद्यापही करण्यात आली नाही. तर चाकूर तालुक्यातून एकूण पाच तडीपारीचे प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. दोन प्रस्ताव अद्यापही प्रलंबित आहेत. दोघा जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे तर एक प्रस्ताव अंतिम सुनावणीदरम्यान रद्द करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)