‘सीफार्ट’ प्रयोगशाळेतील यंत्रे धूळखात पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:15 AM2019-04-27T00:15:48+5:302019-04-27T00:16:10+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मध्यवर्ती सुविधा केंद्रातील (सीएफसी) कोट्यवधी रुपयांची यंत्रे प्रयोग, सराव करण्यासाठी संशोधक विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचे साकडे संशोधक विद्यार्थ्यांच्या रिसर्च फोरमने कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांची भेट घेऊन केली आहे.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मध्यवर्ती सुविधा केंद्रातील (सीएफसी) कोट्यवधी रुपयांची यंत्रे प्रयोग, सराव करण्यासाठी संशोधक विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचे साकडे संशोधक विद्यार्थ्यांच्या रिसर्च फोरमने कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांची भेट घेऊन केली आहे.
विद्यापीठाच्या ‘सीएससी’ केंद्रात तत्कालीन कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या कार्यकाळात कोट्यवधी रुपयांच्या यंत्रांची खरेदी करण्यात आली आहे. ही यंत्रे विद्यापीठातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थ्यांसाठी संशोधन करण्यास उपलब्ध करून देण्याचा निर्णयही तेव्हा घेण्यात आला होता. मात्र, मागील काही वर्षांपासून ही सर्व यंत्रे धूळखात पडून आहेत. या यंत्रांच्या वापर विद्यापीठातील संशोधक विद्यार्थ्यांना करण्यास मिळावा, यासाठी रिसर्च फोरमच्या विद्यार्थ्यांनी दोन दिवसांपूर्वी सीएफसीला भेट दिली. तेव्हा त्याठिकाणी सीएफसीचे संचालक डॉ. सतीश पाटील यांची अनुपस्थिती होती, तर त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली असता, ५ कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीची यंत्रे उपलब्ध असून, ती चालविण्यासाठी तंत्रकुशल व्यक्तीच नाही. ज्या प्राध्यापकांना चालविता येतात, त्यातील दोन-तीन जण स्वत:चे काम करून घेतात. त्यानंतर कोणीही येत नसल्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांची भेट घेतली. यावेळी सर्व समस्या कुलगुरूंना सांगण्यात आल्या. अत्याधुनिक उपकरणे असूनही विद्यार्थ्यांना त्यावर संशोधन करता येत नसेल, तर कशासाठी ही यंत्रे खरेदी करण्यात आली, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. यावेळी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. राजेश करपे, डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. राहुल म्हस्के, डॉ. शंकर अंभोरे, अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे आदींनी संशोधक विद्यार्थ्यांची मागणी उचलून धरत सर्व यंत्रे विद्यार्थ्यांच्या वापरास उपलब्ध झाली पाहिजेत, अशी भूमिका मांडली. यानंतर कुलगुरू येत्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत यंत्रे हातळणाºया व्यक्तीची नेमणूक करण्यासाठी मंजूर घेऊन हा विषय मार्गी लावणार असल्याचे आश्वासन विद्यार्थ्यांना देण्यात आले. यावेळी फोरमचे प्रमुख निखिल चव्हाण, बालाजी मुळीक, संदीप वाघ, चेतन जाधव, दीपक आहेर, अमोल निपटे, अजय मुंडे, सचिन गिराम, प्रसाद देशमुख, अजय पवार, अरुण गवारे, विष्णू बारोटे आदी संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.
या महागड्या उपकरणांचा समावेश
विद्यापीठातील सीएफसी केंद्रात डीटीए-टीजी सिस्टीम, एलओएन क्रोमाटोग्राफी, एक्स प्रो डिफ्राक्टोमेटर, ईडीएस मायक्रो अॅनालिसिस सिस्टीम, स्कॅनिग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, एलसी-एमएस/एमएस, मायक्रोवेव्ह सिस्टीम, सुपरक्रिटिकल फ्लड एक्ट्राक्शन सिस्टीम, एचपीटीएलसी, वॉटर प्युरीफिकेशन्स सिस्टीम या यंत्राचा समावेश आहे.
चौकट,
विद्यापीठ विकास मंचच्या बैठकांचे केंद्र
सीएफसी इमारतीमध्ये असलेली यंत्रे धूळखात पडून आहेत. त्याचा वापर विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी संचालक डॉ. सतीश पाटील यांनी पावले उचलली नाहीत. मात्र, याच ठिकाणी विद्यापीठ विकास मंच, भाजपाच्या संबंधित पदाधिकारी, नेत्यांच्या बैठका रात्री उशिरापर्यंत नियमितपणे होतात. त्या बंद करून विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याकडे संचालकांनी लक्ष द्यावे, अशी मागणी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. राजेश करपे यांनी केली.