औरंगाबादहून ‘इंडिगो’च्या ‘टेकऑफ ’वर शिक्कामोर्तब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 06:21 PM2019-08-20T18:21:05+5:302019-08-20T18:24:18+5:30
विमानतळावर प्राधिकरणाने कार्यालयासाठी दिली जागा
औरंगाबाद : एअर इंडिया, ट्रूजेट आणि स्पाईस जेटपाठोपाठ आता ‘इंडिगो’कडूनही औरंगाबादहून नवीन विमान सुरू करण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘इंडिगो’च्या कार्यालयासाठी प्राधिकरणाने जागा दिली असून, तेथे कार्यालय उभारणीचे क ाम सुरू आहे. त्यामुळे शहरातून ‘इंडिगो’च्या ‘टेकआॅफ ’ होण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे.
चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ट्रूजेट कंपनीच्या कार्यालयाच्या शेजारी ‘इंडिगो’चे कार्यालय उभे राहत आहे. याठिकाणी केबिन, फर्निचरचे काम सुरू आहे. औरंगाबादहून नवीन विमानसेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी ११ जून रोजी टूर आॅपरेटर, उद्योजक आणि व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाची स्पाईस जेट आणि इंडिगोच्या व्यवस्थापकीय समितीसोबत बैठक झाली होती.
यावेळी दोन्ही विमान कंपन्यांनी औरंगाबादमधून नवीन विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानंतर स्पाईस जेटने औरंगाबाद-दिल्ली विमानसेवा जाहीर केली. परंतु ‘इंडिगो’च्या विमानसेवेची प्रतीक्षा करावी लागत आहे. या कंपनीच्या कार्यालयाचे कामकाज सुरू झाल्याने ही प्रतीक्षा लवकरच संपण्याची चिन्हे आहेत.
कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू
औरंगाबादहून विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने १९ जुलै रोजी इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी चिकलठाणा विमानतळावर सोयी-सुविधांचीही पाहणी केली होती. या पाहणीदरम्यान सोयी-सुविधांविषयी अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. त्यानंतर शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये विमानतळावर आवश्यक कस्टमर सर्व्हिस, सुरक्षा, रॅम्प पोझिशन यासह ग्राऊंड स्टाफ आदी कर्मचाऱ्यांची निवड प्रक्रियाही पार पडली. या कर्मचाऱ्यांचे सध्या दिल्ली, बंगळुरू येथे प्रशिक्षण सुरूअसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
स्लॉट मिळताच सेवा
‘इंडिगो’ला सध्या स्लॉट (विमान उड्डाणासाठी वेळ) मिळण्याची प्रतीक्षा आहे. १० आॅक्टोबरपासून विमानसेवा सुरू होऊ शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुंबईसह इतर मार्गावरही विमानसेवा सुरू केली जाऊ शकते.
विमानतळाचे अधिकारी म्हणतात...
‘इंडिगो’ला कार्यालयासाठी जागा दिली आहे. कार्यालय निर्मितीचे काम सुरू आहे. मात्र, विमानसेवेच्या वेळापत्रकासंदर्भात अद्याप काही माहिती मिळालेली नाही, असे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी सांगितले.