'मराठा कुणबी' पुराव्यांची शोधाशोध; मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून रेकॉर्ड मागविले

By विकास राऊत | Published: September 4, 2023 12:35 PM2023-09-04T12:35:55+5:302023-09-04T12:37:16+5:30

रविवारी सुटी असतानाही विभागातील सर्व यंत्रणा खासरा पत्रासह इतर अभिलेखांची जंत्री उघडून पुरावे शोधत होती.

Search for 'Maratha Kunbi' Evidence; Records were sought from all the Collectors of Marathwada | 'मराठा कुणबी' पुराव्यांची शोधाशोध; मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून रेकॉर्ड मागविले

'मराठा कुणबी' पुराव्यांची शोधाशोध; मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून रेकॉर्ड मागविले

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील मराठा समाज हा कुणबी असल्याच्या महसुली नोंदी व इतर पुराव्यांची रविवारी दिवसभर आठही जिल्ह्यातील अभिलेख कक्षांमध्ये शोधाशोध सुरू होती. सुटीच्या दिवशी सर्व तहसील पातळीवरून पुराव्यांची जमवाजमव करण्यात आली आहे. सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे होणाऱ्या तातडीच्या बैठकीत हे सगळे पुरावे मांडण्यात येणार आहेत. बैठकीला विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड जाणार आहेत. तसेच मंगळवारी अप्पर सचिवांकडे देखील आरक्षण अनुषंगाने बैठक होत आहे.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात दोन दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्याचे पडसाद राज्यभर उमटले असून सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी अंतरवालीकडे धाव घेतली. विरोधी पक्षाने आंदोलकांची भेट घेतल्यावर राज्य सरकारवर टीका केली तर सत्ताधाऱ्यांनी आंदोलकांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या घडामोडींदरम्यान शासनाने प्रशासकीय यंत्रणेकडून महसुली दस्तावेजांची माहिती मागविली आहे. मराठवाड्यातील १९५१-५२ या सालापासूनचे खासरापत्र, पाहणी अहवाल, महसुली नोंदीचे पुरावे शोधण्यासाठी शासनाकडून विभागीय आयुक्तांना शनिवारी सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार आयुक्तांनी पूर्ण जिल्हा पातळीवरून महसुली नोंदींची माहिती मागविली. रविवारी दिवसभर आठही जिल्ह्यातील अभिलेख कक्ष महसुली दस्तांची जंत्री उघडून बसले होते.

उघडली महसुली अभिलेखाची जंत्री ....
खासरा पत्रांचा रेकॉर्ड तपासणीसाठी विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना विभागीय आयुक्त मधुकरराजे यांनी आदेश दिले होते. रविवारी सुटी असतानाही विभागातील सर्व यंत्रणा खासरा पत्रासह इतर अभिलेखांची जंत्री उघडून पुरावे शोधत होती. दरम्यान विभागीय आयुक्त आर्दड यांनी सांगितले, महसुली दस्तांची माहिती घेण्यात येत आहे. जालना, धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणच्या खासरा पत्रांवर कुणबी अशा नोंदी आढळून आल्या आहेत. जेवढे पुरावे सापडतील, तेवढे सोमवारच्या बैठकीसमोर ठेवण्यात येतील. सर्व जिल्ह्यातून पुराव्यांची माहिती घेणे पुढील काही दिवस सुरू राहील.

Web Title: Search for 'Maratha Kunbi' Evidence; Records were sought from all the Collectors of Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.