हिमोफेलियाग्रस्तांची शोधाशोध थांबणार; औरंगाबादेत मिळणार २४ तास फॅक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2021 06:52 PM2021-08-05T18:52:10+5:302021-08-05T18:56:46+5:30
रात्रीच्या वेळी फॅक्टर मिळत नसल्याने उद्भवणाऱ्या परिस्थितीची गंभीर दखल
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हिमोफेलियाग्रस्तांसाठी २४ तास फॅक्टर उपलब्ध करून देण्याचा निर्णय आरोग्य यंत्रणेने घेतला असून, यामुळे जीव धोक्यात टाकून रात्री-बेरात्री एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात फॅक्टरची शोधाशोध करीत भटकण्याची वेळ यापुढे टळणार आहे.
औरंगाबादेत १७ जुलै रोजी मध्यरात्री तोंडातून रक्तस्राव होणाऱ्या ९ वर्षांच्या हिमोफेलियाग्रस्त मुलाला घेऊन आई-वडील घाटी रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयात, तर तेथून घाटीत चकरा मारत होते; पण यंत्रणा त्यांना दाद देत नसल्याने अत्यावश्यक फॅक्टर-९ चा डोस मिळत नव्हता. नाइलाजास्तव अहमदनगरला जाण्याची तयारी त्यांनी केली; पण तत्पूर्वी ही आणीबाणीची स्थिती ‘लोकमत’ला कळविली. क्षणाचाही विलंब न करता ‘लोकमत’ प्रतिनिधीने तिकडे धाव घेऊन आरोग्य यंत्रणेला जागे केले व पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात फॅक्टर उपलब्ध करून दिला. फॅक्टरच्या या परिस्थितीविषयी ‘लोकमत’ने १९ जुलैला सविस्तर वृत्त प्रकाशित केले. हिमोफेलियाग्रस्तांना फॅक्टर मिळण्यासाठी ‘डे केअर’ची सुविधा सुरू करण्यात आली. मात्र, रात्रीच्या वेळी फॅक्टर मिळत नसल्याने उद्भवणाऱ्या परिस्थितीची गंभीर दखल घेत यापुढे २४ तास फॅक्टर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा रुग्णालयात पुढील आठवड्यापासून याची सुरुवात होणार आहे. त्यासाठी डाॅक्टर, कर्मचाऱ्यांच्या कर्तव्याचे नियोजन करण्यात आले आहे.
का गरजेचे असते फॅक्टर?
जखम झाली की वाहणारे रक्त हळूहळू गोठते आणि पुढील हानी टळते. शरीराने स्वत:च्या बचावासाठी तयार केलेली ही नैसर्गिक यंत्रणा निकामी ठरली, रक्तातील काही महत्त्वाच्या घटकांनी काम केले नाही किंवा त्या घटकांचा अभाव असेल तर जखमेतून वाहणारे रक्त थांबत नाही. त्या आजारास हिमोफेलिया म्हणतात. या रुग्णांना हे वेळीच फॅक्टर मिळाले नाही तर रक्तस्रावामुळे रुग्णांचा जीव धोक्यात जातो.
फॅक्टर पुरेशा प्रमाणात उपलब्ध
सध्या पुरेशा प्रमाणात फॅक्टर उपलब्ध आहे. सध्या दिवसा फॅक्टर दिले जात आहे. फॅक्टरसाठी येणारा रुग्ण हा अत्यवस्थ असतो. तो कधीही येऊ शकतो. फॅक्टर मिळाले नाही तर धोकादायक ठरू शकते. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात २४ तास फॅक्टर मिळतील. पुढील आठवड्यापासून याची सुरुवात होईल.
- डाॅ. प्रदीप मुरंबीकर, सहायक संचालक तथा प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक