कावसान हत्याकांडातील आरोपींच्या शोधासाठी सर्च ऑपरेशन
By | Published: December 2, 2020 04:11 AM2020-12-02T04:11:17+5:302020-12-02T04:11:17+5:30
पैठण : कावसान येथील तिहेरी हत्याकांडानंतर पोलिसांनी सोमवारी गोदावरी नदीपात्रात सर्च ऑपरेशन करून हत्येसाठी वापरलेल्या शस्त्राचा शोध घेतला. गोदापात्रात ...
पैठण : कावसान येथील तिहेरी हत्याकांडानंतर पोलिसांनी सोमवारी गोदावरी नदीपात्रात सर्च ऑपरेशन करून हत्येसाठी वापरलेल्या शस्त्राचा शोध घेतला. गोदापात्रात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने पोलिसांच्या हाती मात्र सायंकाळपर्यंत काही लागले नव्हते. तपास निश्चित दिशेने सुरू असून आरोपीस अटक केली जाईल एवढीच माहिती स्थानिक पोलिसांकडून मिळत आहे. सध्या गोदावरी नदीपात्रासह परिसरात शोधमोहीम राबविण्यात येत असून सीसीटीव्ही फुटेजही पाहिजे जात आहे. आरोपीच्या तपासाबाबत पोलीस यंत्रणा गोपनीयता बाळगत असल्याचे दिसून आले आहे.
शनिवारी (दि.२८) पहाटे कावसान गावातील अख्खे कुटुंब संपविण्याच्या उद्देशाने मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात पती, पत्नी आणि दहा वर्षांची मुलगी जागीच ठार झाले होते. कुटुंबातील सहा वर्षांचा मुलगा सुदैवाने यात बचावला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. एकाच कुटुंबातील तिघांची हत्या झाल्याने पैठण तालुका हादरला होता. कावसानमधील तिहेरी हत्याकांडातील आरोपीच्या शोधासाठी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक भागवत फुंंदे व पैठण पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी तपास पथके रवाना केलेली असून मारेकऱ्यांना अटक करण्यात अद्याप पोलिसांना मात्र यश आलेले नाही. दरम्यान साेमवारी गोदावरी पात्रात पोलिसांनी हत्येसाठी वापरलेले शस्त्र शोधण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.
हत्येचे घटनास्थळ गोदावरी काठावर असल्याने मारेकऱ्यांनी शस्त्र गोदावरी पात्रात फेकले असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक किशोर पवार, सुधीर ओव्हळ, नामदेव कातडे, राजू शेख, गणेश शर्मा, मनोज वैद्य, राजू आटोळे यांनी स्थानिक पोहणाऱ्या युवकाच्या मदतीने पाण्यात व गोदावरीच्या कावसान डगरीवरील झाडाझुडपात शोध घेतला. दरम्यान शहरातील विविध सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात येत आहेत.