जलवाहिन्या फुटण्याचे सत्र सुरूच; क्रांती चौकात जलवाहिनीला गळतीने निर्जळीचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 01:58 PM2021-02-09T13:58:31+5:302021-02-09T14:03:39+5:30
leakage in 450 mm diameter water pipeline at Kranti Chowk Aurangabad : रविवारी रात्री कोटला कॉलनी जलकुंभावरून क्रांती चौकाकडे जाणाऱ्या जलवाहिनीला तडे बसले.
औरंगाबाद : कोटला कॉलनी येथील जलकुंभावरून क्रांती चौकाकडे जाणाऱ्या ४५० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीला रविवारी रात्रीपासून गळती सुरू झाली. जालना रोडवरील प्रचंड वाहतुकीमुळे सोमवारी महापालिकेला काम करता आले नाही. वाहतूक पोलिसांनीही या कामावर आक्षेप घेतला. सोमवारी मध्यरात्री दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होणार आहे.
शहरात जलवाहिन्या फुटण्याचे सत्र सुरूच आहे. रविवारी पहाटे रेल्वे स्टेशन रोडवर १४०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी फुटली होती. या जलवाहिनीच्या पाण्यामुळे परिसरातील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सोमवारीसुद्धा महापालिकेचे अधिकारी या व्यापाऱ्यांकडे फिरकले नाहीत. रविवारी रात्री कोटला कॉलनी जलकुंभावरून क्रांती चौकाकडे जाणाऱ्या जलवाहिनीला तडे बसले. उड्डाणपूल सुरू होण्यापूर्वीच परिसरात पाणीचपाणी होत आहे. महापालिकेने सोमवारी सकाळी दुरुस्तीसाठी काम सुरू केले. या कामामुळे जालना रोडवरील वाहतूक खोळंबली होती.
वाहतूक पोलिसांनी महापालिकेला रात्री काम करण्याचे निर्देश दिले. रात्री १० वाजता खोदकाम सुरू करण्यात येणार आहे. गळती शोधून दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता किरण धांडे, अभियंता अरुण मोरे यांनी सांगितले. रात्री काम करताना थंडीत मजूर गारठून जातात. दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य बाजारात दुकाने बंद असल्यामुळे भेटत नाही. अशा परिस्थितीत काम करणे खूप कठिण असते, असे मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले. वाहतुकीचा प्रश्न गंभीर असल्याने रात्री काम करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.