मोसमी वाऱ्याची मराठवाड्याच्या दिशेने वाटचाल
By Admin | Published: June 24, 2014 12:51 AM2014-06-24T00:51:05+5:302014-06-24T01:08:37+5:30
औरंगाबाद : नैऋत्य मोसमी वाऱ्याची दिशा सोमवारी सकाळपर्यंत उत्तर-पूर्वेकडे होती. मात्र, दुपारनंतर ही दिशा बदलून उत्तर- पश्चिम झाली आहे.
औरंगाबाद : नैऋत्य मोसमी वाऱ्याची दिशा सोमवारी सकाळपर्यंत उत्तर-पूर्वेकडे होती. मात्र, दुपारनंतर ही दिशा बदलून उत्तर- पश्चिम झाली आहे. त्यामुळे मराठवाड्यासाठी आशादायी चित्र आहे. तरीही मराठवाड्यात पाऊस दाखल होण्यासाठी किमान दोन ते तीन दिवस लागणार असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.
जून महिना संपत आला तरी मराठवाड्यात यंदा पाऊस दाखल झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. या पार्श्वभूमीवर हवामानाच्या अभ्यासकांकडून जाणून घेतले असता त्यांनी मराठवाड्यात पाऊस येण्याच्या दृष्टीने अनुकूल परिस्थिती निर्माण होत असल्याचे सांगितले.
हवामानाचे अभ्यासक श्रीनिवास औंधकर म्हणाले की, उपग्रहाद्वारे मिळालेल्या चित्रानुसार सोमवारी सकाळपर्यंत नैऋत्य मोसमी वाऱ्याची दिशा उत्तर- पूर्व होती. म्हणजे हे वारे ओरिसा, छत्तीसगडच्या दिशेने वाहत होते. मात्र, दुपारनंतर त्यात बदल झाला आहे. ही दिशा आता उत्तर- पश्चिम झाली आहे. हीच दिशा पुढेही कायम राहिली तर येत्या दोन ते तीन दिवसांत ढग मराठवाड्यात पोहोचतील; पण त्यामुळे समाधानकारक पाऊस पडेलच असे मात्र निश्चित सांगता येणार
नाही.
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी हवामान विभागातील प्रा. प्रल्हाद जायभाये म्हणाले की, मान्सूनची व्याख्या पाहता तो याआधीच मराठवाड्यात दाखल झालेला आहे, असे म्हणावे लागेल. काही ठिकाणी मान्सूनचा पाऊस पडलाही आहे. मात्र, त्याचा जोर कमी होता. आता बंगालच्या उपसागराकडून नैऋत्य मोसमी वारे वेगाने उत्तर- पश्चिमेच्या दिशेने येत आहेत. ही दिशा कायम राहिल्यास पुढील दोन- तीन दिवसांत मराठवाड्यात अनुकूल परिस्थिती तयार होऊन पाऊस पडेल.
अन्नधान्याची राज्यांतर्गत आयात-निर्यात करणारे औरंगाबादेतील व्यापारी प्रकाश जैन यांनी सांगितले की, महिनाभरापूर्वीच मूग आणि उडदाचा भाव खाली आला आहे. सध्या मूग आठ हजार ते आठ हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटल जात आहे. तर उडदाचा भाव सात हजार ते सात हजार दोनशे रुपये आहे.
डाळींचा भाव प्रतिकिलो ९० रुपयांपर्यंत आहे. मात्र, यंदाच्या हंगामात फारसे उत्पादन होणार नसल्यामुळे दर पुन्हा वाढतील. त्यात नेमकी किती वाढ होईल हे निश्चित सांगता येणार नसले तरी ती वाढ येत्या महिनाभरातच झालेली दिसेल, असेही त्यांनी सांगितले.
उशिरा पावसाचा फटका
औरंगाबाद : पावसाअभावी मराठवाड्यात मूग आणि उडदाच्या पेरणीचा हंगाम निघून जाणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. परिणामी, राज्यातील मूग आणि उडदाच्या उत्पादनात जबरदस्त घट होऊन त्यांचा भाव वाढण्याची शक्यता आहे. मूग आणि उडदाचे भाव नुकतेच घसरले होते. ते महिनाभरात पुन्हा वाढतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
मराठवाड्यात दरवर्षी खरीप हंगामात सुमारे दीड ते दोन लाख हेक्टर क्षेत्रावर मूग आणि उडीद या कडधान्य पिकांची पेरणी होते. जून महिना हा या पिकांच्या पेरणीचा हंगाम आहे.
हंगाम निघून गेल्यावर पेरणी झाल्यास ती पिके व्यवस्थित येत नाहीत. त्यामुळे शेतकरीही जूननंतर या पिकांची पेरणी करीत नाहीत.
यंदा जून महिना संपत आला तरी अद्याप पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे यंदा मराठवाड्यात या कडधान्य पिकांच्या पेरणीचा हंगाम पावसाअभावी निघून जाणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
राज्यातील मूग आणि उडदाचे उत्पादन यंदा घटणार आहे. परिणामी जूननंतर या दोन्हींचे दर वाढणार आहेत.