अकरावी प्रवेशासाठी जागा २९ हजार; नोंदणी झाली केवळ १६ हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 07:32 PM2019-07-05T19:32:46+5:302019-07-05T19:34:34+5:30
आॅनलाईन नोंदणीच्या मुदतवाढीनंतरही प्रतिसाद अल्प; जागा रिक्त राहणार
औरंगाबाद : शहरात ११० महाविद्यालये असून, अकरावी प्रवेशाच्या आॅनलाईन नोंदणीच्या शेवटच्या दिवशी अर्जाचा भाग-२ भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या केवळ १६ हजार ४८४ एवढी आहे. उपलब्ध जागांचा आकडा २९ हजार १०० एवढा आहे. यामुळे आताच १२ हजारांपेक्षा अधिक जागा रिक्त राहणार असल्याचे स्पष्ट झाले.
मुंबई, पुण्याच्या धर्तीवर औरंगाबाद शहरातील उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेश केंद्रीय पद्धतीने देण्यात येत आहेत. मागील दोन वर्षाप्रमाणे यावर्षीही उपलब्ध जागा आणि नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात तूट झाली आहे. दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अकरावी प्रवेशाच्या आॅनलाईन नोंदणीला सुरुवात झाली होती. सुरुवातीला आॅनलाईन अर्जाचा भाग-१ भरण्यात येत होता. तर निकाल जाहीर झाल्यानंतर १२ दिवसांनी म्हणजेच १९ जून रोजी अर्जाचा भाग-२ भरण्यास सुरुवात झाली होती. या नोंदणीला मराठा आरक्षणातील बदलामुळे एक वेळ मुदतवाढही देण्यात आली.
आॅनलाईन नोंदणीची मुदत गुरुवारी (दि.४) सायंकाळी ६ वाजता संपली. भाग-१ भरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १९ हजार ७३६ एवढी आहे. भाग-२ भरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १६ हजार ४८४ एवढी आहे. मात्र भाग-२ भरल्यानंतरच विद्यार्थ्याला प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येते. शहरातील ११० महाविद्यालयांमध्ये उपलब्ध जागांची संख्या ही २९ हजार १०० आहे. त्यामुळे १२ हजार ६१६ जागा नोंदणीपूर्वीच रिक्त राहणार आहेत. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकीही अनेक जण तंत्रनिकेतन, आयटीआयसह इतर अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे यावर्षी रिक्त जागांचा आकडा हा १५ हजारांवर जाण्याची शक्यता आहे.
आज सर्वसाधारण गुणवत्ता यादी
अकरावी प्रवेशाच्या नोंदणीची मुदत गुरुवारी संपल्यामुळे सर्वसाधारण गुणवत्ता यादी शुक्रवारी (दि.५) सायंकाळी ७ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. या यादीवर आक्षेप घेण्यासाठी ६ ते ८ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. शिक्षण उपसंचालक यांच्याकडे हे आक्षेप नोंदवावे लागतील. यानंतर पहिली गुणवत्ता यादी १२ जुलै रोजी जाहीर केली जाणार आहे. पहिल्या यादीतील प्रवेश १३ ते १६ जुलैदरम्यान घ्यावे लागणार आहेत.
उपलब्ध जागांची आकडेवारी
प्रकार कला वाणिज्य विज्ञान एमसीव्हीसी
अनुदानित ४८५५ २१८५ ४७२० १७२०
विना अनु. २१२० ११६० ४८४० ५७०
कायम वि.अ. ० ० ६०० १००
स्वयंअर्थसाह्य १४०० १६८० ३१२० ३०
एकूण ८३७५ ५०२५ १३,२८० २४२०