कल्ल्याच्या मातेकडे दुस-याचे बाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 01:10 AM2017-11-28T01:10:57+5:302017-11-28T01:11:02+5:30
पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार कल्ल्या ऊर्फ कलीम खान याच्या ६० वर्षीय सावत्र आईकडे दुसºयाच दाम्पत्याचे दीड महिन्याचे बाळ आढळल्याने खळबळ उडाली. हे बाळ उस्मानपुरा पोलिसांनी ताब्यात घेऊन बाळाच्या आई-वडिलांच्या सुपुर्द केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार कल्ल्या ऊर्फ कलीम खान याच्या ६० वर्षीय सावत्र आईकडे दुसºयाच दाम्पत्याचे दीड महिन्याचे बाळ आढळल्याने खळबळ उडाली. हे बाळ उस्मानपुरा पोलिसांनी ताब्यात घेऊन बाळाच्या आई-वडिलांच्या सुपुर्द केले.
न्यायालयाच्या आदेशाने हर्सूल कारागृहात बंद असलेला कुख्यात गुन्हेगार कल्ल्या ऊर्फ कलीम खान याच्या कबीरनगर येथे राहणाºया वृद्ध मातेकडे दुसºयाचे कोणाचे तरी दीड महिन्याचे बाळ आहे. हे बाळ त्या महिलेकडे मागील महिन्यापासून असल्याची माहिती खबºयाने उपनिरीक्षक राहुल चव्हाण यांना दिली.
उपनिरीक्षक चव्हाण आणि कर्मचा-यांनी २५ नोव्हेंबर रोजी सातारा परिसरातील हमिदिया गार्डन येथील त्या महिलेच्या घरावर छापा मारला असता तेथे दीड महिन्याचे बाळ आढळले. या बाळाविषयी अधिक चौकशी केली असता बाळाच्या आई-बाबानेच ते आपल्याकडे दिले असून, ते कामानिमित्त पुणे येथे गेले आहे, असे सांगितले. बाळाचे आई-वडील दुसरेच असल्याचे समोर येताच पोलिसांनी बाळाची घाटी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर महिला व बालकल्याण समितीच्या आदेशाने बालगृहात ठेवले.
कल्ल्याच्या आईने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बाळाच्या वडिलांना फोन करून बोलावून घेतले. तेव्हा त्यांनी त्यांचे हे चौथे अपत्य असून, त्याची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने चौथ्या बाळाचा उदरनिर्वाह करू शकत नसल्याने हे बाळ दिल्याचे त्यांनी सांगितले.
बाळाच्या वडिलाची बहीण आणि कल्ल्याची बहीण शेजारी राहतात. यामुळे कल्ल्याच्या बहिणीची आणि बाळाच्या वडिलांची ओळख असल्याने त्यांनी बाळाला कल्ल्याच्या बहिणीकडे दिले.
कल्ल्याच्या बहिणीला आधीच दोन मुले आहेत. असे असताना त्यांनी दुसºयाचे बाळ सांभाळण्याची तयारी त्याच्या वडिलांना दर्शविली. मात्र ते बाळ स्वत:कडे न ठेवता तिने तिच्या आईकडे दिले.