राज्यातील दुसरे महिला डाक कार्यालय औरंगाबाद शहरात सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:51 AM2018-01-18T00:51:31+5:302018-01-18T00:51:37+5:30
राज्यातील दुसरे महिला डाक कार्यालय औरंगाबादेत बुधवारी सुरू करण्यात आले. महिला सबलीकरणासाठी औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या परिसरात डाक विभागाने महिला टपाल कार्यालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : राज्यातील दुसरे महिला डाक कार्यालय औरंगाबादेत बुधवारी सुरू करण्यात आले. महिला सबलीकरणासाठी औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या परिसरात डाक विभागाने महिला टपाल कार्यालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
कार्यालयाचे उद्घाटन न्यायमूर्ती एस. एस. शिंदे, न्यायमूर्ती विभा व्ही. कंकणवाडी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी औरंगाबाद परिक्षेत्राचे पोस्टमास्टर जनरल प्रणव कुमार, एच. ए. पाटील (रजिस्टार), एस. बी. देशपांडे (असिस्टंट सॉलिसिटर जनरल आॅफ इंडिया), आर. आर. काकानी (रजिस्टार) आर. एम. देशमुख (अध्यक्ष वकील संघटना), ए. एस. बायस (सचिव, वकील संघटना) आणि ए. एस. रसाळ (वरिष्ठ डाक अधीक्षक, औरंगाबाद) यांची उपस्थिती होती.
भारतातील पहिले महिला डाक कार्यालय ८ मार्च २०१३ रोजी नवी दिल्लीतील शास्त्री भवन डाक कार्यालयात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सुरू केले होते. दुसरे कार्यालय मुंबईच्या नवीन कस्टम हाऊस टपाल कार्यालयात १२ एप्रिल २०१३ रोजी कार्यान्वित केले होते. औरंगाबाद परिक्षेत्राने त्याच धरतीवर दि. १७ बुधवारी महिला डाक कार्यालय सुरु केले आहे. सबलीकरणासाठी असणाºया विविध घटनात्मक तरतुदी नमूद करताना एका डाक कार्यालयाची जबाबदारी महिलांकडे दिली आहे. महिलांच्या सबलीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलल्याचे न्या. एस. एस. शिंदे यांनी नमूद केले.
या टपाल कार्यालयात रेल्वे बुकिंगची सेवादेखील उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून विविध भागांतून न्यायालयात कामकाजासाठी येणाºया नागरिकांनादेखील त्याचा फायदा होईल. त्यावर पोस्ट जनरल प्रणव कुमार यांनी रेल्वे बुकिंगची सेवा लवकरच सुरू करण्याचे मान्य केले. कार्यक्रमास सहायक डाक अधीक्षक ए. के. शेख, जी. एल. देशमाने आदींची उपस्थिती होती.
कार्यालयात महिला कर्मचारी...
उच्च न्यायालय टपाल कार्यालयात एकूण ३ महिला कर्मचारी टपाल विभागाच्या सर्व सेवासुविधा देण्याचे काम करतील. सध्याच्या परिस्थितीत औरंगाबाद डाक परिक्षेत्रात एकूण २२.१४ टक्के महिला कर्मचारी आहेत.