घाटी रुग्णालयामुळेच दुसऱ्यांदा अवैध गर्भपात उघड; जबाबदार यंत्रणा ढिम्म 

By संतोष हिरेमठ | Published: February 6, 2023 07:47 PM2023-02-06T19:47:58+5:302023-02-06T19:50:10+5:30

तीन महिन्यांपूर्वी अवैध गर्भपातातून महिलेचा मृत्यू, तरी यंत्रणा हलली नाही

Second Illegal Abortion Exposed Due to Ghati Hospital Aurangabad; Responsible system Dhimm | घाटी रुग्णालयामुळेच दुसऱ्यांदा अवैध गर्भपात उघड; जबाबदार यंत्रणा ढिम्म 

घाटी रुग्णालयामुळेच दुसऱ्यांदा अवैध गर्भपात उघड; जबाबदार यंत्रणा ढिम्म 

googlenewsNext

- संतोष हिरेमठ
औरंगाबाद :
घाटी रुग्णालयाने तीन महिन्यांपूर्वीच जिल्ह्यात अवैध गर्भपाताचा उद्योग सुरू असल्याचे समोर आणले होते; परंतु, तेव्हा कोणीही लागले नाही. आता पुन्हा एकदा घाटीमुळेच अवैध गर्भपाताचा प्रकार उघडकीस आला आणि रुग्णालयासह दोन डाॅक्टरांची नावेही समोर आली. मात्र, आरोग्य विभागाच्या यंत्रणेकडून अवैध गर्भपाताचे प्रकार रोखण्यासाठी ठोस प्रयत्न नसल्याचे दिसत आहे. चितेगाव येथील अवैध गर्भपाताच्या प्रकारानंतर जागे झालेल्या आरोग्य विभागाने आता गर्भपात केंद्रे आणि सोनोग्राफी केंद्रांची तपासणी मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला.

अवैध गर्भपात केल्यानंतर धोपटेश्वर येथील एका महिलेचा ऑक्टोबर २०२० मध्ये मृत्यू झाला होता. या महिलेलादेखील गंभीर अवस्थेत घाटीत दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. दरम्यान, महिलेच्या गर्भपिशवीला छिद्र असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. अवैध गर्भपाताच्या संशयाने पोलिसांचा तपास जटवाड्यात एका फ्लॅटपर्यंत पोहोचला होता; परंतु, पुढे काही घडले नाही. दरम्यान, तीन महिन्यांनंतर चितेगाव येथील खासगी रुग्णालयात गर्भपात झालेली महिला गंभीर अवस्थेत घाटीत दाखल झाली आणि अवैध गर्भपाताचा उद्योग उघडकीस आला. या सगळ्यात लिंगनिदान आणि गर्भपात रोखण्यासाठी काम करणारी यंत्रणा अवैध गर्भपात रोखण्यात अपयशी ठरत असल्याची चर्चा आहे.

एक लाख रुपयांचे बक्षीस; पण...
वैद्यकीय गर्भपात कायदा १९७१ प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाकडून वारंवार सांगण्यात येते. मान्यताप्राप्त गर्भपात केंद्रे, सोनोग्राफी केंद्राच्या नियमित तपासणीचा दावाही केला जातो. अवैध गर्भपाताविषयी माहिती देणाऱ्या व्यक्तीला एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाते; परंतु, नागरिकांमधूनही त्यासाठी कोणी पुढे येत नाही.

अवैध गर्भपाताच्या गोळ्याही...
अवैधरित्या खरेदी करून गर्भपाताच्या गोळ्या खाण्याचा प्रकार सुरू आहे. डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्या घेतल्याने अति रक्तस्राव आणि अर्धवट गर्भपात झालेल्या महिला घाटीत येत असल्याचे निरीक्षण डाॅक्टरांनी नोंदविले आहे. कोणाच्या सल्ल्याने या गोळ्या घेतल्या, याचे उत्तरच बहुतांश महिला देत नाहीत. गर्भपाताच्या गोळ्यांचा अवैध विक्रीचाही ‘उद्योग’ जिल्ह्यात जोरात सुरू आहे.

केंद्रांची तपासणी करणार
मान्यताप्राप्त गर्भपात केंद्र आणि सोनोग्राफी केंद्राची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. उघड झालेल्या अवैध गर्भपात प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांना मदत केली जाईल.
- डाॅ. दयानंद मोतीपवळे, जिल्हा शल्यचिकित्सक

Web Title: Second Illegal Abortion Exposed Due to Ghati Hospital Aurangabad; Responsible system Dhimm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.