चार कामगारांच्या मृत्यू प्रकरणी रॅडिको कंपनीला औद्योगिक सुरक्षा विभागाकडून दुसरी नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 18:02 IST2024-12-21T18:01:43+5:302024-12-21T18:02:19+5:30

रॅडिको कंपनीत १५ नोव्हेंबर रोजी झालेल्या दुर्घटनेत चार कामगारांचा मृत्यू झाला होता.

Second notice from Industrial Safety Department to Radico Company after death of four workers | चार कामगारांच्या मृत्यू प्रकरणी रॅडिको कंपनीला औद्योगिक सुरक्षा विभागाकडून दुसरी नोटीस

चार कामगारांच्या मृत्यू प्रकरणी रॅडिको कंपनीला औद्योगिक सुरक्षा विभागाकडून दुसरी नोटीस

छत्रपती संभाजीनगर : शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील मद्य निर्मिती करणाऱ्या रॅडिको एन. व्ही. इंडस्ट्रीज कंपनीत मागील महिन्यात मका साठवण्याचा सायलो (मोठी पत्र्याची टाकी) फुटल्याने चार कामगारांचा मृत्यू झाला होता. औद्योगिक सुरक्षा विभागाच्या चौकशीत या घटनेला कंपनी प्रशासन दोषी असल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर औद्योगिक सुरक्षा विभागाने कंपनीला दोन नोटिसा पाठवून त्यांचे म्हणणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आता कंपनीविरोधात पुढील कारवाई करण्यासाठी शासनास प्रस्ताव पाठविण्याची तयारी अधिकारी करीत असल्याची माहिती आहे. शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत १५ नोव्हेंबर रोजी तीन हजार टन मका साठविलेल्या टाकीच्या वेल्डिंगचे काम सुरू असताना टाकी फुटली. यातील मक्याच्या ढिगाऱ्याखाली दबून आणि टाकीचा पत्रा लागल्याने चार कामगारांचा मृत्यू झाला होता. औद्योगिक सुरक्षा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत या घटनेला कंपनी जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले. याविषयीचा अहवाल तयार केल्यानंतर अधिकाऱ्यांनी कंपनीला एकापाठोपाठ दोन नोटिसा पाठवून त्यांचे म्हणणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. कंपनीच्या उत्तराची अधिकारी प्रतीक्षा करीत आहेत. कंपनीच्या उत्तराची पुढील चार दिवस प्रतीक्षा केल्यानंतर कंपनीवरील पुढील कारवाईचा प्रस्ताव शासनास पाठविण्यात येणार आहे. या कारवाईला शासनाकडून परवानगी मिळताच कंपनीविरोधात न्यायालयात खटला भरण्यात येणार असल्याची माहिती उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी दिली.

कंपनीच्या दोन मॅनेजरसह ठेकेदाराला अटकपूर्व जामीन
रॅडिको कंपनीत १५ नोव्हेंबर रोजी झालेल्या दुर्घटनेत विजय गवळी, दत्तात्रय बोढरे, संतोष पोपळघट आणि किसन हिरडे या कामगारांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी करमाड पोलिस ठाण्यात कंपनीचे सहायक व्यवस्थापक सुरेंद्र खैरनार, महादेव पाटील आणि लेबर कॉन्ट्रॅक्टर ज्ञानेश्वर रिठेविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्यात सर्व आरोपींना सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला होता. यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात या निर्णयाविरोधात अपील दाखल केले होते. खंडपीठाने तिन्ही आरोपींना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केल्याची माहिती तपास अधिकारी बनकर यांनी दिली.

Web Title: Second notice from Industrial Safety Department to Radico Company after death of four workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.