विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांच्या अकॅडमिक ऑडिटची दुसरी फेरी लवकरच
By योगेश पायघन | Published: November 17, 2022 07:21 PM2022-11-17T19:21:59+5:302022-11-17T19:22:25+5:30
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने शैक्षणिक गुणवत्ता व सुविधांचा दर्जा वाढवण्यासाठी अकॅडमिक ऑडिटची मोहीम हाती घेतली.
औरंगाबाद : 'नॅक' मुल्यांकन केलेल्या महाविद्यालयांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अकॅडमिक ऑडीटमध्ये कमी ग्रेड मिळाले. नॅकचे मुल्यांकन गुणवत्तेवर तर विद्यापीठाचे शैक्षणिक, प्रशासकीय अकेक्षण हे गुणवत्ता आणि परिमाणात्मक आहे. २४३ महाविद्यालयांचे मुल्यांकन पूर्ण झाले असून उर्वरीत महाविद्यालयांचे ऑडिट ८ दिवसांत करू, त्यानंतर अकॅडमिक ऑडिटची दुसरी फेरी सुरू करत आहोत, असे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सांगितले.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने शैक्षणिक गुणवत्ता व सुविधांचा दर्जा वाढवण्यासाठी अकॅडमिक ऑडिटची मोहीम हाती घेतली. विद्यापीठाशी संलग्नित ४८० पैकी ४०१ कॉलेजचे मूल्यांकन करण्यासाठी प्रस्ताव आले. त्यापैकी २४३ महाविद्यालयांचे मुल्यांकन पुर्ण झाले. मूल्यांकनात ३९ महाविद्यालयांना ‘ए’, ३५ महाविद्यालयांना ‘बी’, ३४ महाविद्यालयांना ‘सी’ ग्रेड तर ६८ महाविद्यालयांना ‘डी’ ग्रेड देण्यात आला होता तर ‘नो ग्रेड’च्या ४५ महाविद्यालयांतून ‘डी’ ग्रेड व ‘नो’ ग्रेडच्या महाविद्यालयातून ७० महाविद्यालये निवडून त्यांच्या भाैतिक सुविधांची पडताळणी सुरू झाली आहे. त्यातील २३ महाविद्यालयांवर कुलगुरूंनी विशेष अधिकारात दंडात्मक कारवाई केली. तर २१ नापास महाविद्यालयांवर मुळ मंजुरी शिवाय असलेल्या प्रवेशांवर बंदी घातली.
प्राचार्य नेमणुक, आवश्यक अध्यापक, सुविधा संलग्नीत महाविद्यालयात असल्याशिवाय यापुढील संलग्नीकरणावर शिक्कामोर्तब होणार नसल्याचेही कुलगुरूंनी यापुर्वीच स्पष्ठ केले आहे. उच्च शिक्षण सचिवांनी या मुल्यांकनाचे कौतुक करत इतर विद्यापीठांनीही अनुकरण करण्याच्या सुचना दिल्या. विद्यापीठाच्या 'युनिक'ने तयार केलेल्या १३ सॉफ्टवेअरची मागणीही इतर विद्यापीठांकडून होत असल्याचे कुलगुरूंनी सांगितले.
रखडलेले ऑडिट ८ दिवसांत पूर्ण करा
प्रशासन गतिमान करण्यासाठी ४५ जणांची नुकतिच खांदेपालट केली. त्या बदल्या आता रद्द होणार नाही. अधिकारी-कर्मचारी रूजू होत आहे. प्रशासनाची बैठक घेवून अपेक्षित कामाच्या सुचना कुलगुरूंनी दिल्या. तसेच अकॅडमिक ऑडिट आठ दिवसांत पुर्ण करण्याचे आदेशही दिले. त्यानंतर लगेच अकॅडमिक ऑडिटची दुसरी फेरी सुरू करू. शिक्षण आणि सुविधांची गुणवत्ता आणि सुविधांचा दर्जा उंचावणे हा या मोहीमेचा उद्देश असल्याचे कुलगुरूंनी स्पष्ठ केले.