६ नोव्हेंबरपासून दुसरे शैक्षणिक सत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 12:28 AM2017-10-14T00:28:16+5:302017-10-14T00:28:16+5:30
दिवाळीच्या सुट्यांबाबत शिक्षण समितीने फेरनिर्णय जारी केला. त्यानुसार आता १६ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबरपर्यंत सुट्या असतील
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : दिवाळीच्या सुट्यांबाबत शिक्षण समितीने फेरनिर्णय जारी केला. त्यानुसार आता १६ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबरपर्यंत सुट्या असतील. ४ नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंती व ५ नोव्हेंबर रोजी रविवारची सुटी असल्यामुळे सोमवारी ६ नोव्हेंबरपासून नियमित दुसरे शैक्षणिक सत्र सुरू होईल.
‘लोकमत’ने१० नोव्हेंबरच्या अंकात ‘दिवाळीच्या सुट्यांवरून संघटना आक्रमक’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करताच शिक्षणाधिकारी रवींद्र वाणी यांनी शिक्षण सभापती मीनाताई शेळके व समिती सदस्यांसोबत चर्चा करून दिवाळीच्या सुट्यांबाबत फेरनिर्णय घेतला. त्यासंबंधीचे पत्र काढून ते गटशिक्षणाधिका-यांमार्फत जिल्ह्यातील जि.प. शाळा, खाजगी अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना जारी केले. सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने १५ आॅक्टोबर ते १ नोव्हेंबर अशा एकूण १७ दिवसांच्या दिवाळीच्या सुट्या जाहीर केल्या होत्या. सुट्यांच्या या निर्णयास महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक संघटना, प्राथमिक शिक्षक संघ व अन्य शिक्षक संघटनांनी कडाडून विरोध केला. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीसाठी २१ दिवसांच्या सुट्या द्याव्यात, या मतावर संघटना ठाम होत्या.
शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या वर्षभराच्या सुट्यांच्या वेळापत्रकानुसार १५ ते २८ आॅक्टोबरपर्यंत दिवाळीच्या सुट्यांचा कालावधी होता. तथापि, शिक्षक संघटनांचा वाढता दबाव लक्षात घेता शिक्षणाधिकारी रवींद्र वाणी यांनी सुट्यांमध्ये दोन दिवसांची वाढ करून त्या ३० आॅक्टोबरपर्यंत केल्या होत्या. त्यानंतर ६ आॅक्टोबर रोजी झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत सर्वानुमते १ नोव्हेंबरपर्यंत सुट्यांचा निर्णय झाला. त्यानुसार २ नोव्हेंबर रोजी दुसरे शैक्षणिक सत्र सुरू होणार होते. शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळांना वर्षभरात ७६ दिवसांपेक्षा जास्त सुट्या नसाव्यात. ही बाब लक्षात घेऊन दिवाळीच्या सुट्यांचे नियोजन करण्यात आले, असे शिक्षणाधिका-यांचे म्हणणे होते. वर्षभरात उन्हाळी सुट्या, दिवाळी सुट्या, सार्वजनिक (सरकारी) सुट्या, विभागीय आयुक्तांच्या अखत्यारीत ३ दिवसांच्या आणि मुख्याध्यापकांच्या अखत्यारीत २ दिवसांच्या सुट्या असतात. या सर्वांची सांगड घालत १ नोव्हेंबरपर्यंतच दिवाळीच्या सुट्या देता येतील, अशी भूमिका समितीने घेतली होती.
दुसरीकडे, महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक- शिक्षकेतर सेनेने शिक्षणाधिकारी आणि शिक्षण सभापतींना यासंदर्भात दिलेल्या निवेदनाद्वारे सुट्यांबाबत सविस्तर भूमिका कळविली होती. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क अधिनियम २००९ अन्वये संपूर्ण शैक्षणिक वर्षामध्ये २०० ते २२० दिवस अध्ययन- अध्यापनाचे कामकाज झाले पाहिजे; परंतु आपल्याकडे या चालू शैक्षणिक वर्षामध्ये २३० दिवसांपेक्षा अधिक शैक्षणिक कामकाज होत आहे. तथापि, अन्य जिल्ह्यांमध्ये यावर्षी १५ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबरपर्यंत दिवाळीच्या सुट्या जाहीर करण्यात आल्या असून, ४ नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंतीची सार्वजनिक सुटी आहे. ५ नोव्हेंबर रोजी रविवार असून, ६ नोव्हेंबरपासून दुसºया शैक्षणिक सत्राला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या जिल्ह्यातही ३ आॅक्टोबरपर्यंत सुट्या जाहीर कराव्यात, अशी मागणी संघटनेचे राज्य सरचिटणीस सुभाष महेर, जिल्हाध्यक्ष बिजू मारग, भरत पाटील, शिवकुमार वाणी यांनी केली होती.