आगरा येथील लाल किल्ल्यावर सलग दुसऱ्या वर्षी शिवजन्मोत्सव
By बापू सोळुंके | Published: February 18, 2024 08:27 PM2024-02-18T20:27:29+5:302024-02-18T20:27:46+5:30
राज्य शासनाच्या सहकार्ययाने अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दरवर्षी जगभर साजरी करण्यात येते. गतवर्षी उत्तरप्रदेशातील आग्रा शहरातील लाल किल्ल्यातील दिवाण ए आम येथे जेथे औरंगजेबने छत्रपती शिवरायांना कैद करण्याचे आदेश दिले होते. त्याच ठिकाणी गतवर्षीपासून शिवजयंती महोत्सव साजरा केला जात आहे. यावर्षीही महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने छत्रपती संभाजीनगर येथील अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्यावतीने आग्र्यात शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
१९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता आग्रा येथील लाल किल्ल्यात होत असलेल्या शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेव दानवे, आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि खासदार उदयन राजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती आयोजक विनोद पाटील यांनी दिली.
ते म्हणाले की, औरंगजेबने छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायला बोलावून दगाबाजी करीत कैद केले होते. आग्रा किल्ल्यातील ज्या ठिकाणी औरंगजेबने छत्रपती शिवरायांना कैद करण्याचे आदेश दिले होते त्याच दिवाण ए आम येथे शिवजन्मोत्सव होत आहे. या महोत्सवाला राज्यभरातून शेकडो शिवप्रेमी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे डिजिटल माध्यमावरून प्रसारण केले जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.