सलग दुसऱ्या वर्षी गुड फ्रायडेचा 'ऑनलाईन' संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:02 AM2021-04-03T04:02:26+5:302021-04-03T04:02:26+5:30
गेल्यावर्षी २३ मार्चपासून राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यामुळे गेल्यावर्षी १० एप्रिल २०२० रोजी गुड फ्रायडेचा संदेश पहिल्यांदा ...
गेल्यावर्षी २३ मार्चपासून राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यामुळे गेल्यावर्षी १० एप्रिल २०२० रोजी गुड फ्रायडेचा संदेश पहिल्यांदा 'ऑनलाईन' प्रसारित करण्यात आला होता.
२००० वर्षांपूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताला शुक्रवारी वधस्तंभावर खिळण्यात आले होते. येशू ख्रिस्ताच्या बलिदानाचा स्मरण दिन म्हणजे उत्तम शुक्रवार (गुड फ्रायडे ) निमित्त जगभर अत्यंत भक्तिभावे गांभीर्याने तीन तासांची भक्ती घेऊन विशेष संदेश दिले जातात .
शुक्रवारी मराठवाडा धर्म प्रांताचे महागुरू बिशप एम .यू. कसाब यांनी धर्म प्रांतातील औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण मंडळ्यांना गुड फ्रायडेचा विशेष संदेश ऑनलाईन दिला. त्याचप्रमाणे कॅथलिक पंथाच्या औरंगाबाद धर्म प्रांताचे महागुरू बिशप डॉ.अँब्रोस रिबेलो यांनीसुद्धा गुड फ्रायडेचा विशेष संदेश ऑनलाईन दिला .
शहर, छावणी, सिडको आणि वाळूज परिसरातील सर्व पंथीय ख्रिस्ती समाजाच्या धर्मगुरूंनी उत्तम शुक्रवारनिमित्त दुपारी १२ ते ३ वाजेदरम्यान होणारी भक्ती (प्रार्थना) आणि संदेश ऑनलाईन प्रसारित केला. ख्रिस्ती समाजबांधवांनी आपापल्या घरातूनच या विशेष संदेशाचे श्रवण केले. येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरून उच्चारलेल्या सात वाक्यांचा आणि विशेषतः येशूचा छळ करणाऱ्या रोमी शिपायांना उद्देशून ' हे बापा यांना क्षमा कर, कारण ते काय करीत आहेत हे त्यांना समजत नाही. ' अशी प्रार्थना करून जगाला 'क्षमेचा' संदेश दिला होता. याचे स्मरण करून त्या सात वाक्यांचा मथितार्थ धर्मगुरूंनी विदित केला.