कोट्यवधींची जागा ‘कवडी’मोल दरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 12:38 AM2017-10-14T00:38:23+5:302017-10-14T00:38:23+5:30
महापौर बापू घडमोडे यांनी २० जुलै २०१७ रोजी घेतलेल्या सर्वसाधारण सभेत अनेक ठराव छुप्या पद्धतीने घेतल्याचे समोर येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महापौर बापू घडमोडे यांनी २० जुलै २०१७ रोजी घेतलेल्या सर्वसाधारण सभेत अनेक ठराव छुप्या पद्धतीने घेतल्याचे समोर येत आहे. सिडको एन-९ येथील शाळेची कोट्यवधी रुपयांची जागा अत्यंत ‘कवडी’मोल दरात एका शैक्षणिक संस्थेच्या घशात घालण्याचा ठराव गुपचूप मंजूर करण्यात आला आहे. दिव्यांग मुलांच्या शाळेसाठी महापालिकेकडे अनेकदा जागा मागण्यात आली; मात्र महापालिका पदाधिका-यांचा हृदयाचा पाझर दिव्यांग मुलांसाठी फुटला नाही.
सिडको एन-९ येथील महापालिकेच्या शाळेत परिसरातील गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेतात. ही शाळा एका खाजगी शैक्षणिक संस्थेला देण्याचा ठराव २० जुलै रोजीच्या सभेत घेण्यात आला. ही शैक्षणिक संस्था सीबीएससीप्रमाणे विद्यार्थ्यांना शिक्षण देईल. महापालिकेच्या विद्यार्थ्यांनाही ते मोफत शिकवणार आहेत. संस्था महापालिकेला दरमहा दीड लाख रुपयेही देणार असल्याचे महापौर बापू घडमोडे यांच्याकडून सांगण्यात येत आहे. या निर्णयामुळे महापालिकेचाच आर्थिक फायदा होईल, गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल असा दावाही करण्यात आला आहे. महापौरांनी एवढे चांगले काम केले तर निर्णय गुपचूप का घेण्यात आला यावर आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सर्वसाधारण सभेत चर्चा का घडवून आणण्यात आली नाही. ज्या शैक्षणिक संस्थेला मनपाची शाळा देण्याचा निर्णय झाला त्या संस्थेकडे स्वत:चे किती विद्यार्थी आहेत. डबघाईला आलेल्या शैक्षणिक संस्थेला मनपाची शाळा देण्यामागचा हेतू काय, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सिडको एन-९ येथील मनपाच्या शाळेची जागा जवळपास दोन एकर आहे. जागेची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. जागा बळकावण्याच्या हेतूनेच संस्थेने हा सर्व खटाखोप केल्याचे बोलले जात आहे. मनपाच्या शहरात अनेक शाळा आहेत, सिडको एन-९ येथील जागाच का निवडण्यात आली. यामागे सेनेचे एक माजी नगरसेवकही असल्याची चर्चा आहे.