गुपचूप विवाहनंतर प्रसूती होताच आईने काढला पळ; पोलिसांनी आठ महिन्यांनी शोधले आई-बाबा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 08:05 PM2022-05-02T20:05:45+5:302022-05-02T20:06:22+5:30

कुटुंबाच्या भीतीने लपवले लग्न, पोलिसांमुळे तान्ह्या बाळाला मिळाले आठ महिन्यांनी आई-बाबा

secretly marriaed mother fled after giving birth; Police find parents after eight months | गुपचूप विवाहनंतर प्रसूती होताच आईने काढला पळ; पोलिसांनी आठ महिन्यांनी शोधले आई-बाबा

गुपचूप विवाहनंतर प्रसूती होताच आईने काढला पळ; पोलिसांनी आठ महिन्यांनी शोधले आई-बाबा

googlenewsNext

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात ३० ऑगस्ट २०२१ रोजी एका महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला होता. या बाळाला रुग्णालयातच सोडून माता पहिल्या दिवशी पळून गेली. डॉक्टरांनी शोधाशोध केल्यानंतर बेगमपुरा पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तब्बल आठ महिने बाळाच्या आईचा शोध घेऊन त्याचे डीएनए अहवाल तपासले. ते जुळल्यानंतर आठ महिन्यांच्या बाळाला त्याच्या जन्मदात्या आई-वडिलांकडे शनिवारी सुपूर्द केले.

बेगमपुरा ठाण्याचे निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट २०२१ रोजी एक तरुणी पुरुष जातीचे नवजात अर्भक सोडून गेली होती. डॉ. प्रवीण सुखदेवे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आईच्या विरोधात गुन्हा नोंदवला गेला. तपास फौजदार विशाल बोडखे यांच्याकडे देण्यात आला. तिने दवाखान्यात दिलेले नाव चुकीचे असल्याचे स्पष्ट झाले. घाटीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र, गर्दीमुळे युवतीस ओळखणे अशक्य होते. बाळाला साकार शिशुगृहात ठेवत त्याचे ‘किरण’ असे नाव ठेवले. अधिक तपासात युवतीने सोनोग्राफी एमजीएम रुग्णालयात केल्याचे स्पष्ट झाले. तेथे नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा महिलेच्या वडिलांनी त्या नावाची आपली मुलगी नसल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांना घटनाक्रम सांगितला. विश्वासात घेऊन तिची चौकशी केली. तेव्हा तिने ते बाळ आपले असल्याची कबुली दिली. 

उपनिरीक्षक बोडखे, उपनिरीक्षक ज्योती गात यांनी तिच्या माहेर व सासरच्या कुटुंबांचे मनपरिवर्तन केले. मग दोन्ही कुटुंबे बाळाला स्वीकारण्यास तयार झाली. पोलिसांनी बाळाचा ताबा देण्यासाठी बालकल्याण विभागाला विनंती केली. तेव्हा त्यांनी बाळ व आईचा डीएनए जुळला, तरच ताबा देण्यात येईल, असे स्पष्ट केले. तो अहवाल सकारात्मक आल्यानंतर बाल कल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. मनोहर बन्सवाल, सदस्य प्रा. अश्विनी लखमले, ॲड. अनिता शिऊरकर यांनी बाळाला आई-वडिलांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले. ही कामगिरी पोनि. पोतदार यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक बोडखे, गात, हवालदार हैदर शेख, प्रवीण केणी, रियाज मोमीन, शरद नजन, श्रीकांत सपकाळ यांच्या पथकाने केली.
 

कुटुंबाच्या भीतीने लपवले लग्न
या तरुणीचे एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. ९ ऑक्टोबर २०२० रोजी त्यांनी गुपचूप विवाह केला. मात्र भीतीपोटी एकत्र राहिले नाहीत. त्यांच्यातील संबंधामुळे महिलेला दिवस गेले. सहा महिन्यांनंतर तिने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी म्हणून औरंगाबादेत भाड्याने खोली घेतली. नंतर यथावकाश घाटीत बाळाला जन्म दिला. या बाळाला कुटुंबीय स्वीकारणार नाहीत, या भीतीपोटी तिने सोडल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.

Web Title: secretly marriaed mother fled after giving birth; Police find parents after eight months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.