जगाला एकसंध ठेवण्यासाठी धर्मनिरपेक्ष व्यवस्था उपयुक्त - दलाई लामा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 03:07 AM2019-11-24T03:07:30+5:302019-11-24T07:14:18+5:30
सबंध जगाला एकत्र ठेवायचे असेल तर धर्माच्या विचारावर आधारित राजकीय व्यवस्था उपयुक्त ठरणार नाही, तर धर्मनिरपेक्ष व्यवस्था उपयुक्त आहे.
औरंगाबाद : सबंध जगाला एकत्र ठेवायचे असेल तर धर्माच्या विचारावर आधारित राजकीय व्यवस्था उपयुक्त ठरणार नाही, तर धर्मनिरपेक्ष व्यवस्था उपयुक्त आहे. धर्म ही वैयक्तिक बाब समजून सबंध मानवजातीला मानवतेच्या दृष्टिकोनातून बघणारी व्यवस्था आवश्यक आहे, असे प्रतिपादन जागतिक धर्मगुरू दलाई लामा यांनी केले.
एकदा लडाखमध्ये असताना तेथील एका स्थानिक इमामांनी सांगितलेले विचार मौलिक वाटतात. ते म्हणाले होते ‘मी प्रथम अल्लावर प्रेम करतो, नंतर अल्लाने निर्माण केलेल्या सृष्टीवर प्रेम करतो’ हे विचार अत्यंत महत्त्वाचे आहे. बुद्धाचीही अशीच शिकवण आहे. भारताची लोकशाही ही याच विचारावर आधारित आहे. मानवजातीला मन:शांतीची गरज आहे, असे बुद्ध सांगत असत. आज वैज्ञानिकही तेच सांगत आहेत. समाजातील वैयक्तिक व्यवहार हे मानवतावादी असल्यास चांगल्या समाजाची निर्मिती होऊ शकते. असे सांगून जगभरातील बौद्ध धर्मीयांच्या तत्त्वज्ञानाचा मूळ आधार काय आहे, हेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. संस्कृत भाषेतील आधारित बौद्ध तत्त्वज्ञानाचा वापर मंगोलिया, तिबेट, चीन, व्हिएतनाम, कोरिया आणि म्यानमार या देशांत केला जातो, तर मूळ पाली भाषेतील तत्त्वज्ञानावर आधारित बौद्ध धर्माचे झाले. थायलंड, श्रीलंका, बर्मा, कंबोडिया आदी देशात केले जाते. बुद्धाचे विचार आणि तत्त्वज्ञान हे मूळ पाली भाषेतच आहे, असेही दलाई लामा म्हणाले.
धर्म ही व्यक्तिकेंद्रित व्यवस्था नाही. बुद्धालाही ते मान्य नव्हते. बुद्धाने स्वत:हून अनुयायांना सांगितले होते ते म्हणजे ‘माझे विचार सारासार विचार करून पटले तर स्वीकारा अन्यथा सोडून द्या’. शिक्षण आणि अभ्यासातून बुद्ध धम्माचे अधिकाधिक ज्ञान प्राप्त करून ते लोकांना सांगणे हीच बुद्धाची शिकवण आहे. बुद्ध धम्मात आत्म्याला स्थान नाही, पण ज्ञानाला स्थान आहे. त्यामुळे बुद्ध कधीही आत्मा आणि अनात्मा या विवादात पडले नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बुद्धाला विष्णूचा ९ वा अवतार मानले जाते, याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना होय हे शक्य आहे, कारण भारत हा अध्यात्म मांडणारा आणि अतिप्राचीन अशी संस्कृती असणारा देश असल्याने इथे अनेक विचारधारा स्वीकारल्या गेल्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भारतातील बौद्ध धर्मातील पुनर्स्थापनेमध्ये अत्यंत महत्त्वाचे योगदान आहे. १९५६ ला त्यांनी आपल्या अनुयायांना दीक्षा देऊन बौद्ध धम्मात आणले. समतेचा पुरस्कार करणारे आणि जातीवर आधारित भेदभावपूर्ण व्यवस्था नाकारणारे ते महान नेते होते. त्यांनी जातीवर आधारित वरील वर्गाच्या लोकांनी खालच्या जातीवर राज्य गाजविणारी व्यवस्था कालबाह्य असल्याचे सांगितले. मला भारतीय लोकशाहीचे कौतुक वाटते. येथे स्वातंत्र्य आहे. जगात पहिल्या क्रमांकाची लोकसंख्या असलेल्या चीनमध्ये ते स्वातंत्र्य नाही, असेही दलाई लामा म्हणाले.