जिल्हाधिकारी निवासस्थानाचीच सुरक्षाव्यवस्था तकलादू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 01:10 AM2018-07-30T01:10:10+5:302018-07-30T01:10:36+5:30
पोलिसांचा रात्रंदिवस खडा पहारा असलेल्या जिल्हाधिकारी यांच्या बंगल्याची सुरक्षा भेदून चोरट्यांनी तेथील चंदनाची तीन झाडे तोडून नेली. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस यंत्रणेचे धाबे दणाणले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पोलिसांचा रात्रंदिवस खडा पहारा असलेल्या जिल्हाधिकारी यांच्या बंगल्याची सुरक्षा भेदून चोरट्यांनी तेथील चंदनाची तीन झाडे तोडून नेली. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस यंत्रणेचे धाबे दणाणले. गुन्हे शाखा आणि बेगमपुरा पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिका-यांच्या बंगल्यात जाऊन पाहणी केली आणि ठसेतज्ज्ञ, श्वान पथकामार्फत चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला.
व्ही.आय.पी. रस्त्यावर जिल्हाधिकारी उदय चौधरी यांचे शासकीय निवासस्थान आहे. या बंगल्याच्या मागे शासकीय महाविद्यालय आणि डाव्या बाजूला सुभेदारीमध्ये जाणारा रस्ता आहे. जिल्हाधिका-यांच्या बंगल्यात पाच ते दहा वर्षांची चंदनाची तीन झाडे होती. सुभेदारीकडील रस्ता आणि शासकीय महाविद्यालयाकडून बंगल्याच्या आतील ही झाडे सहज दिसतात. चंदन तस्कारांची या चंदनाच्या झाडावर नजर पडली होती. बंगल्याच्या मुख्य प्रवेशदारावर पोलीस २४ तास तैनात असतात. बंगल्याच्या समोरच्या बाजूने कुंपणाची उंच भित असल्याने चोरट्यांनी बंगल्याच्या उजव्या बाजूच्या मागील भिंतीवरून उड्या मारून आत प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी अत्यंत सफाईदारपणे तेथील चंदनाची तीन झाडे तोडली. या झाडांच्या बुंध्याचे (खोड) मोठी लाकडे चोरटे घेऊन गेले. बंगल्यातील शिपाई शेरखान गफूर खान यांना रविवारी सकाळी हा प्रकार लक्षात आला. त्यांनी या घटनेची माहिती लगेच जिल्हाधिकारी यांना दिली. त्यानंतर बेगमपुरा पोलिसांना याबाबत कळविण्यात आले.
बेगमपुरा ठाण्याच्या निरीक्षक राजश्री आडे, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अनिल वाघ आणि कर्मचा-यांनी बंगल्याकडे धाव घेऊन पाहणी केली.
श्वान पथक, ठसेतज्ज्ञांनाही पाचारण
पोलिसांनी लगेच ठसेतज्ज्ञ आणि श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण केले. श्वानाने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, श्वान बंगल्याच्या बाहेरच घुटमळला, यावरून चोरटे एखाद्या वाहनातून पसार झाले असावे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. याप्रकरणी शिपाई शेरखान यांनी बेगमपुरा ठाण्यात दिलेल्या तक्रारीत २७ जुलै रोजी चोरट्यांनी बंगल्यातील पाच हजार रुपये किमतीची चंदनाची तीन झाडे तोडून नेल्याचे नमूद केले.